शिवजयंती उत्साहात, मोठ्या प्रमाणात आयोजित करा – मंत्री सुधीर मुनगंटीवार
• महेश आनंदा लोंढे
मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांनी स्थापन केलेले स्वराज्य हा भारताच्या इतिहासातील एक देदिप्यमान अध्याय आहे. छत्रपती शिवाजी महाराजांची राजकीय, सामाजिक आणि प्रशासकीय ध्येयधोरणे आजही आपल्या सर्वासाठी प्रेरणादायी व मार्गदर्शक आहेत. त्यामुळे त्यांच्या जयंती दिनी त्यांच्याप्रति कृतज्ञता अर्पण करणे, हे सर्वांचे कर्तव्य आहे. राज्यातील सर्वांनी शिवजयंती अतिशय उत्साहाने आणि मोठ्या प्रमाणात साजरी करावी, असे आवाहन वन, सांस्कृतिक कार्य आणि मत्स्यव्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले आहे.
यासंदर्भात, मंत्री श्री. मुनगंटीवार यांनी सर्व जिल्हाधिकारी यांना पत्र पाठवले असून प्रत्येक जिल्ह्यात शिवजयंती उत्सव विविध कार्यक्रमांनी, सर्वांचा सहभाग घेत साजरी करण्याच्या सूचना दिल्या आहेत. शिवजयंती ज्या ठिकाणी साजरी होईल, त्या ठिकाणचा परिसर स्वच्छ सुंदर व आकर्षक ठेवावा. कार्यक्रमाच्या ठिकाणी रंग-रंगोटी करुन रोषणाई करणे, रांगोळी काढणे आदी व्यवस्था करण्याबाबत कळविले आहे.
शिवजयंती उत्सवाच्या आरंभी राज्यगीत वाजविण्यात यावे व त्यासाठी पोलीस बँडची व्यवस्था करावी. कार्यक्रमाच्या आधी व कार्यक्रमादरम्यान शिववंदना, स्थानिक कलावंतांकडून पोवाडा गायन, छत्रपती शिवाजी महाराजांच्या संदर्भातील गीत-गायन इत्यादी सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करावेत. शिक्षण विभागामार्फत विद्यार्थ्यांसाठी निबंध स्पर्धा, शौर्यगीत स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा आयोजित करण्यात याव्यात. यासंदर्भात स्थानिक जिल्हास्तरावर व्यापक प्रसिध्दी करावी. जिल्ह्यातील अधिकाधिक नागरिकांचा यामध्ये सहभाग असावा, अशा सूचना मंत्री श्री. मुनगंटीवार यांनी सर्व जिल्हाधिकारी यांना दिल्या आहेत.
कार्यक्रमाच्या अनुषंगाने स्थानिक स्तरावर प्रसिद्धीसाठी टीजर, शॉर्ट क्लिप, ग्राफिक्स, विविध मान्यवर यांच्या आवाहनाचे छोटे व्हिडिओ प्रसारण अशा पद्धतीने समाज माध्यमांचा उचित उपयोग करावा. कार्यक्रमाच्या प्रसिद्धीसाठी पत्रकार परिषदेचे आयोजन करावे, अशा सूचनाही मंत्री श्री. मुनगंटीवार यांनी केल्या आहेत.
राज्य शासनामार्फत दरवर्षी दि. १९ फेब्रुवारी रोजी छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती शासकीय कार्यालयात साजरी करण्यात येते. दि. १९ फेब्रुवारीचे औचित्य साधून छत्रपती शिवाजी महाराज यांचे ज्या ठिकाणी पुतळे/स्मारके आहेत, तेथे जयंती साजरी करण्यात यावी, असे निर्देशही राज्य शासनाने दिले आहेत. त्याचीही अंमलबजावणी करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत.
सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या संकल्पनेतून वर्षभरात विविध उपक्रम
दरम्यान, शिवराज्याभिषेकाच्या ३५० व्या वर्षानिमित्त राज्यात सांस्कृतिक कार्य मंत्री श्री. मुनगंटीवार यांच्या संकल्पनेतून सांस्कृतिक कार्य विभाग आणि इतर विभागांच्या साह्याने विविध उपक्रम राबविण्यात आले. यामध्ये बऱ्याच वर्षापासून प्रतापगड किल्ल्याच्या पायथ्याशी झालेले अतिक्रमण वन विभागामार्फत हटविण्यात आले.
दि. १९ फेब्रुवारी २०२३ रोजी आग्रा येथील दिवाण –ए – खास या महालामध्ये शिवजयंती उत्सव साजरा करण्यात आला. त्या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व मंत्री श्री. मुनगंटीवार उपस्थित होते. राज्याभिषेकाच्या एक महिना आधी छत्रपती शिवाजी महाराजांनी प्रतापगड येथील भवानी मातेच्या मंदिरामध्ये भवानी मातेसाठी छत्र अर्पण केले होते. त्या घटनेचे औचित्य साधून श्री. मुनगंटीवार यांनी यावर्षी दिनांक २१ मे २०२३ रोजी प्रतापगड येथील भवानी माता मंदिरास चांदीचे छत्र अर्पण केले.
सन २०२३ च्या रायगड येथील शिवराज्याभिषेकाच्या सोहळ्यासाठी देशभरातील विविध ठिकाणचे पवित्र जल एकत्र करून सहस्त्रजलकलश यात्रा २६ मे २०२३ रोजी राजभवन येथून सुरू करण्यात आली व या जलाद्वारे रायगड येथे दि. २ जून २०२३ रोजी छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळ्याच्या वेळी जलाभिषेक करण्यात आला. रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवराज्याभिषेक सोहळा साजरा करण्यात येतो. त्यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांची मिरवणूक चांदीच्या पालखीतून काढण्यात येते. या मिरवणूक सोहळ्यासाठी चांदीची पालखी मंत्री श्री. मुनगंटीवार यांचेमार्फत रायगड उत्सव समितीस भेट देण्यात आली.
दिनांक १ जून २०२३ रोजी गेट वे ऑफ इंडिया, मुंबई येथे राज्य शासनाच्या पुरातत्त्व विभागामार्फत शिवकालीन शस्त्रास्त्रांचे प्रदर्शन भरविण्यात आले. ३५० व्या शिवराज्याभिषेक वर्षानिमित्त सांस्कृतिक कार्य विभागामार्फत विशेष लोगोचे प्रसारण करण्यात आले. किल्ले रायगड येथे दि. २ जून २०२३ रोजी तिथीप्रमाणेही शिवराज्याभिषेक सोहळा साजरा करण्यात आला. दि. ६ जून २०२३ रोजी शिवराज्याभिषेक वर्षाच्या निमित्ताने “शिवकालीन होन” या विशेष टपाल तिकिटाचे राजभवन, मुंबई येथे अनावरण करण्यात आले. मंत्रालयात सार्वजनिक उद्घोषणा प्रणालीद्वारे दररोज सकाळी शिवविचार प्रसारणास दि. १८ ऑगस्ट २०२३ पासून सुरुवात झाली. तेव्हापासून मंत्रालयात कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी दररोज सकाळी १० वाजून ४५ मिनिटांनी एक शिवविचार ऐकवण्यात येतो.
छत्रपती शिवाजी महाराजांचे वडील श्री शहाजीराजे यांच्यावरील विशेष टपाल तिकिटाचे अनावरण दि. १८ ऑगस्ट २०२३ रोजी मंत्रालयात करण्यात आले. छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजलखानाच्या वधासाठी वापरलेली वाघनखे सध्या लंडन येथील व्हिक्टोरिया अँड अल्बर्ट म्युझियम मध्ये आहेत. ती वाघनखे भारतात आणण्याच्या सामंजस्य करारावर दि. ३ ऑक्टोबर २०२३ रोजी स्वाक्षरी करण्यात आली. जम्मू – काश्मीर मधील कुपवाडा येथे भारतीय आर्मीच्या बेसवर छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा दि. ७ नोव्हेंबर २०२३ रोजी बसविण्यात आला. दि. १२ जानेवारी २०२४ रोजी छत्रपती शिवाजी महाराजांच्या मातोश्री मॉसाहेब जिजाऊ यांच्या जयंती दिनानिमित्त त्यांचे जन्मस्थळ सिंदखेडराजा, जिल्हा बुलढाणा येथे विशेष टपाल तिकिटाचे अनावरण करण्यात आले. सांस्कृतिक कार्य विभागामार्फत छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित महानाट्याचे प्रयोग प्रत्येक जिल्ह्यात करण्यात येत आहेत. याचा आरंभ १३ जानेवारी २०२४ रोजी नागपूर येथे करण्यात आला. “मराठा साम्राज्याचे चलन” या विषयासंदर्भात जनजागृतीसाठी एकदिवसीय शिबिर महाराष्ट्र राज्यात बारा ठिकाणी घेण्यात येणार आहे. तसेच या विषयासंदर्भात मराठी, हिंदी, इंग्रजी या भाषांमध्ये कॉफीटेबल बुक तयार करण्यात येणार आहे.
राज्याचे वित्त व नियोजन मंत्री असताना श्री. मुनगंटीवार यांनी पुढाकार घेऊन श्री शिवाजी मेमोरियल कमिटी, श्रीशैल्यम, आंध्र प्रदेश यांच्या मागणीनुसार छत्रपती शिवाजी महाराजांचे श्रीशैल्यम येथे ध्यानमंदिर बांधण्यासाठी रुपये ३ कोटी ३८ लाख आर्थिक मदत महाराष्ट्र शासनामार्फत करण्यात आली होती.
SR. NO.9/9, MAHATMA PHULE ROAD, MALI ALI, NEAR OLD MAHADEV TEMPLE, BHOSARI, DIST-PUNE-411039, MAHARASHTRA
About
भारत सरकार मान्यता प्राप्त व महाराष्ट्रातून नियमित प्रकाशित होणारे साप्ताहिक एकच ध्येय वृत्तपत्र आहे. सामाजिक बांधिलकीतून व नागरिकांच्या अडी-अडचणी तसेच शासन व प्रशासनाच्या नागरिकांच्या कल्याणासाठी असणाऱ्या बातम्या, आमच्या वृत्तपत्रातून व www.ekachdhyeya.com या वेबसाईटवर नियमित प्रकाशित करत आहोत.