शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर बुधवारी निकाल देणार

 

मुंबई (वृत्तसंस्था) : शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर उद्या निकाल देणार आहे.सर्वोच्च न्यायालयानं त्यांना याप्रकरणी १० जानेवारी पर्यंत निकाल देण्याचे आदेश दिले आहेत.आमदारांच्या अपात्रतेच्या प्रकरणी विधानसभा अध्यक्षांनी प्रतोद आणि विधीमंडळ पक्ष नेत्याबाबतचा निर्णय शिवसेनेच्या घटनेनुसार चौकशी करुन घ्यावा,असे निर्देश न्यायालयानं दिले होते.विधीमंडळ पक्षाला नव्हे,तर राजकीय पक्षाला प्रतोद नेमण्याचा अधिकार असल्याचं सर्वोच्च न्यायालयानं गेल्यावर्षी मे महिन्यात दिलेल्या निकालात स्पष्ट केलं.त्यामुळं शिंदे गटानं भरत गोगावले यांची प्रतोद म्हणून केलेली नेमणूक न्यायालयानं अवैध ठरवली होती.विधानसभा अध्यक्ष मेरीटवर निकाल देतील, अशी आशा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केली आहे.लोकसभा,विधानसभेत आमच्याकडे बहुमत आहे.आम्ही नियमानं काम करणारं सरकार स्थापन केल्याचा दावा त्यांनी केला.यामुळंच निवडणूक आयोगानंही शिवसेना हे पक्षाचं नाव तसंच धनुष्य बाण हे पक्षचिन्ह आम्हालाच दिल्याचं मुख्यमंत्री म्हणाले.नार्वेकर यांनी काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली होती.यावर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी टीका केली आहे.न्यायमूर्तीच आरोपींना भेटत असतील तर न्यायाची अपेक्षा कोणाकडे करायची असं ते म्हणाले.या मुद्द्यावर काल सर्वोच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र दाखल केल्याची माहिती उद्धव ठाकरे यांनी दिली.विधानसभा अध्यक्षांच्या निकालात आम्हाला न्याय मिळेल.आमचं सरकार कालही स्थिर होतं आणि उद्याही स्थिर राहील,अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.