सर्वांच्या सहभाग, सहकार्यातून शक्तीशाली, प्रगतशील महाराष्ट्र घडवूया

 

मुंबई : महाराष्ट्र देशाचे ‘ग्रोथ इंजिन’ असून  २०२४ या नव्या वर्षात हे इंजिन अधिक शक्तिमान, गतिमान करुया. शेती, उद्योग, व्यापार, शिक्षण, आरोग्य, सहकार, गुंतवणूक अशा सर्व क्षेत्रात महाराष्ट्राचे अव्वल स्थान कायम राखूया… छत्रपती शिवाजी महाराजांच्या आदर्शांवर, राजर्षी शाहू महाराज, महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर या महामानवांच्या विचारांवर महाराष्ट्राची वाटचाल कायम ठेवूया… जाती, धर्म, भाषा, पंथ, प्रांत, लिंगभेदाच्या भिंती तोडून टाकूया… अज्ञान, अनीती, अंधश्रद्धा, अनिष्ठ रुढी-प्रथा-परंपरा नष्ट करुया… सत्यशोधक, पुरोगामी, विज्ञानवादी विचारांचा अंगिकार करुया… आपल्या सर्वांच्या सहभाग, सहकार्य, प्रयत्नांतून मजबूत, प्रगत महाराष्ट्र घडवूया..,”  अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्यातील जनतेला नवीन वर्ष २०२४ च्या शुभेच्छा दिल्या आहेत.

उपमुख्यमंत्री अजित पवार आपल्या शुभेच्छा संदेशात म्हणतात की, मावळत्या २०२३ वर्षाला निरोप देऊन नव्या २०२४ या वर्षाचे स्वागत करत असताना सिंहावलोकन करण्याची गरज आहे. मागील वर्षात अपूर्ण राहिलेले संकल्प नव्या वर्षात पूर्ण करण्याचा प्रयत्न करुया. २०२३ वर्ष राज्यासाठी आव्हानांसोबत यशाचे वर्ष होतं. शेतकरी बांधवांच्या कष्टांमुळे कृषी प्रगती, कामगारांच्या श्रमांमुळे औद्योगिक प्रगती अखंड सुरु राहिली. कला, क्रीडा, साहित्य, संस्कृती, आरोग्य, शिक्षण अशा सर्व क्षेत्रात महाराष्ट्राने उल्लेखनीय यश मिळवले. परकीय गुंतवणुकीत महाराष्ट्र देशात अव्वल राहिला. राज्याची सामाजिक वीण अधिक घट्ट झाली.  हे सर्व संचित घेऊन आपण नवीन वर्षात प्रवेश करत आहोत. नवीन २०२४ वर्ष सर्वांच्या जीवनात सुख, शांती, समृद्धी, उत्तम आरोग्य घेऊन येवो. मनातल्या इच्छा-आशा-आकांक्षा पूर्ण होवोत. सर्वांना प्रगतीची संधी उपलब्ध होवो, असेही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्या शुभेच्छा संदेशात म्हटले आहे.