एकोणसत्तराव्या सवाई गंधर्व भीमसेन संगीत महोत्सवाचा पुण्यात सुरेल समारोप

 

मुंबई (वृत्तसंस्था) : पुण्यात गेले पाच दिवस सुरू असलेल्या ६९ व्या सवाई गंधर्व भीमसेन संगीत महोत्सवाची काल रसिकांच्या उच्चांकी गर्दीत सुरेल सांगता झाली. महोत्सवाच्या कालच्या शेवटच्या आणि पाचव्या सत्रात पंडित भीमसेन जोशी यांचे सुपुत्र श्रीनिवास जोशी यांनी शुद्ध सारंग हा राग आपल्या दमदार आणि आश्वासक गायकीने रंगवला. त्यानंतर आग्रा घराण्याच्या ज्येष्ठ गायिका डॉक्टर पौर्णिमा धुमाळे यांनी बरवा आणि खट या दोन अनवट रागात घराणेदार दर्जेदार गायन करून रसिकांना आनंद दिला. यावर्षी पंडित सी आर व्यास यांची जन्मशताब्दी असल्याने त्यांचे सुपुत्र सुहास व्यास यांनी धानी आणि श्री या रागात अनुभव सिद्ध भावपूर्ण गायन करून त्यांना श्रद्धांजली अर्पण केली.

कर्नाटक शास्त्रीय संगीतातील युवा पिढीतील व्हायोलिन वादिका डॉक्टर ऐश्वर्या व्यंकटरमण आणि सहकाऱ्यांनी शंकराभरणम या रागात विविध रचना सादर करून रसिकांची वाहवा मिळवली. सत्राच्या उत्तरार्धात गायिका कौशिकी चक्रवर्ती यांनी पुरिया कल्याण राग  नटवून रसिकांवर स्वरमोहिनी घातली. त्यानंतर पंडित रोणू मुजुमदार यांचे जय जयवंती रागातील रंगतदार बासरी वादन झालं. भारतरत्न पंडित भीमसेन जोशी यांच्या गायनाची ध्वनीचित्रफित लावून कालच्या महोत्सवाची सांगता झाली. पंडित भीमसेनजींचे स्वर मनात साठवतच रसिकांनी सवाईच्या स्वरमंडपाचा निरोप घेतला.