आशियाई क्रीडास्पर्धांमधे भारताची आजवरची सर्वाधिक पदकांची कमाई

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) हाँगझो आशियाई क्रीडा स्पर्धांमधे आज तिरंदाजीच्या सांघिक प्रकारात ओजस देवतळे, प्रथमेश जावकर आणि अभिषेक शर्मा यांच्या चमूनं कोरियाच्या संघाचा २३५ विरुद्ध २३० असा पराभव करुन सुवर्णपदक मिळवलं. ज्योती सुरेखा वेण्णम, प्रणित कौर आणि अदिती गोपीचंद यांच्या महिला संघानेही तिरंदाजीत सुवर्णपदक मिळवलं.  स्क्वॅशमधे मिश्रगटात दीपिका पल्लिकल आणि हरिंदर संधू यांच्या जोडीने मलेशियाच्या जोडीचा २-० असा पराभव करुन सुवर्णपदकाला गवसणी घातली. भारताच्या पुरुष कबड्डी संघाने ग्रुप ए च्या सामन्यात तैवानचा ५० विरुद्ध २७ गुणांनी पराभव केला. भारताचा पुढचा सामना आता जपानबरोबर होणार आहे. ८३ पदकांसह भारत पदक तालिकेत चौथ्या स्थानावर आहे. आशियाई क्रीडा स्पर्धेत ही भारताची आतापर्यंतची सर्वोत्तम कामगिरी आहे.