महाराष्ट्र जितक्या वेगानं विकसित होईल, तितक्याच वेगानं देशाचा विकास होईल - प्रधानमंत्री

 


मुंबई (वृत्तसंस्था) : महाराष्ट्र जितक्या वेगानं विकसित होईल, तितक्याच वेगानं देशाचा विकास होईल, असं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज शिर्डीमध्ये केलं. देशाला २०४७ पर्यंत विकसित करण्याचा संकल्प करण्याचं आवाहनही त्यांनी केलं. शिर्डीमध्ये निळवंडे धरणाचं जलपूजन, डाव्या कालव्याचं लोकार्पण, शिर्डीतल्या साईबाबा मंदिरातल्या दर्शन रांगेच्या संकुलाचं उद्घाटन यासह साडे ७ हजार कोटींच्या विविध विकासकामांचं लोकार्पण आणि पायाभरणी केल्यानंतर ते शेतकऱ्यांना संबोधित करत होते.

‘नमो शेतकरी महासन्मान निधी योजने’ चा पहिला हप्ता राज्यातल्या ८६ लाखाहून अधिक लाभार्थ्यांना देण्याची सुरुवातही प्रधानमंत्र्यांच्या हस्ते झाली. शेतकऱ्यांसाठी असलेल्या केंद्र सरकारच्या विविध योजनांची माहिती त्यांनी उपस्थितांना दिली.राज्यातल्या प्रलंबित असलेल्या २६ सिंचन योजना पूर्ण करण्यासाठी केंद्र सरकार प्रयत्नशील असल्याचं त्यांनी सांगितलं. तब्बल ५ दशकांनंतर निळवंडे धरण पूर्ण झाल्याबद्दल प्रधानमंत्र्यांनी आनंद व्यक्त केला. केंद्र सरकारकडून सहकार चळवळ मजबूत करण्यासाठी विविध प्रयत्न सुरू आहेत. आतापर्यंत ७ हजार शेतकरी उत्पादक संघटनांच्या माध्यमातून शेतकरी एकत्र आल्याची माहिती त्यानी दिली.

राज्यातले प्रलंबित नदीजोड प्रकल्प पूर्ण करण्यासाठी केंद्र सरकारनं मदत करावी, असं आवाहन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी प्रधानमंत्र्यांना केलं.  पश्चिम वाहिनी नद्यांचं पाणी गोदावरीत आणलं, वैनगंगेचं पाणी नळगंगेत आणलं तर मराठवाडा, विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्र दुष्काळमुक्त व्हायला मदत होईल, असं ते म्हणाले.

निळवंडे धरणाच्या माध्यमातून ६८ हजार हेक्टर जमीन ओलिताखाली येणार असल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी दिली.  या योजना राबवणं राज्य सरकारच्या आवाक्याबाहेर आहे. त्यामुळं केंद्र सरकारनं या योजना हाती घ्याव्या असं आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलं.

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी उद्घाटन केलेल्या दर्शन रांग संकुलामध्ये दहा हजारांहून अधिक भाविकांच्या एकत्रित आसनक्षमतेसह अनेक प्रतिक्षागृह, वस्तू ठेवण्यासाठी जागा, स्वच्छतागृहे, बुकिंग काउंटर, प्रसाद काउंटर, माहिती केंद्रासारख्या वातानुकूलित कक्षांची सोय करण्यात आली आहे.निळवंडे धरणाच्या डाव्या कालव्यांमुळं अहमदनगर जिल्ह्यातले सहा आणि नाशिक जिल्ह्यातल्या एका तालुक्यातल्या १८२ गावांना लाभ होईल. अहमदनगर शासकीय रूग्णालयामधल्या आयुष हॉस्पिटलसह अनेक विकास प्रकल्पांचे उद्घाटन आणि लोकार्पण, कुर्डुवाडी-लातूर रोड रेल्वे विभागाचे विद्युतीकरण, जळगाव ते भुसावळ दरम्यानच्या रेल्वेमार्गावर तिसरी आणि चौथी लाइन, राष्ट्रीय महामार्गावर सांगली ते बोरगाव विभागाचे चौपदरीकरण. इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेडच्या मनमाड टर्मिनलवर अतिरिक्त सुविधा आदि प्रकल्पांचं उद्घाटन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं. त्यांच्या हस्ते काही लाभार्थ्यांना आयुष्मान कार्ड आणि स्वामित्व कार्डचं वाटप झालं.