माजी सैनिकांच्या पाल्यांना पंतप्रधान शिष्यवृत्ती योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन

 

पुणे : केंद्रीय सैनिक बोर्ड, नवी दिल्ली यांच्यामार्फत पंतप्रधान शिष्यवृत्ती योजना २०२३-२४ अंतर्गत ऑनलाईन अर्ज करण्याची प्रक्रिया १ सप्टेंबर पासून सुरू झाली आहे. पुणे जिल्ह्यातील माजी सैनिक तसेच माजी सैनिक विधवांच्या पाल्यांनी या शिष्यवृत्ती योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयातर्फे करण्यात आले आहे.

इयत्ता १२ वी, पदविका व पदवी परीक्षेत किमान ६० टक्के गुण मिळवून उत्तीर्ण झाले आहेत व त्यांनी इंजिनिअरिंग, बी.टेक, एमबीबीएस, बीडीएस, बी.एड, बीबीए, बी. फार्म, बीसीए, एमबीए, व एमसीए आदी अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतला आहे अशा पाल्यांसाठी शिष्यवृत्ती दिली जाते. शिष्यवृत्ती अभ्यासक्रमाची यादी व अर्ज केंद्रीय सैनिक बोर्ड, नवी दिल्ली यांच्या www.ksb.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. संबंधित माजी सैनिक, माजी सैनिक विधवांनी त्यांच्या पाल्यांचे अर्ज ३० नोव्हेंबर २०२३ पूर्वी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाकडे सादर करावेत.

अर्ज भरण्यापूर्वी लाभार्थ्यांनी संकेतस्थळावर देण्यात आलेल्या परिशिष्ट १ ते ३ च्या प्रती सैनिक कल्याण अधिकारी, विद्यापीठाचे कुलगुरू, महाविद्यालयाचे प्राचार्य, उपप्राचार्य, अधिष्ठाता, सह अधिष्ठाता, निबंधक अथवा संचालक आदींची स्वाक्षरी घेवून सोबत ठेवावेत व जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाकडून ई-मेलद्वारे देण्यात आलेल्या तारखेस अर्जाची प्रिंट व त्यासोबत जोडलेल्या कागदपत्रांच्या मूळ प्रती घेवून जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयात कागदपत्रांच्या पडताळणीकरीता उपस्थित राहावे. अधिक माहितीसाठी दूरध्वनी क्रमांक ०२०-२६१२२२८७ वर संपर्क करावा, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी ले. कर्नल स.दै. हंगे (नि.) यांनी केले आहे.