मध्यप्रदेशात प्रधानमंत्र्यांनी ५० हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्चाच्या विविध विकास योजनांची केली पायाभरणी

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) भारताच्या जी-20 अध्यक्षपदाच्या काळात देशाच्या कानाकोपऱ्यातल्या संस्कृतीची ओळख जगाला झाली असून, जगात भारताचा सन्मान वाढला असल्याचं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. मध्यप्रदेशात बीना इथं भारत पेट्रोलियमच्या तेलशुद्धिकरण कारखान्याच्या परिसरात बांधण्यात येणाऱ्या पेट्रोकेमिकल संकुलाची पायाभरणी केल्यानंतर ते बोलत होते. मध्यप्रदेशातल्या विविध पायाभूत सुविधा विकास तसंच औद्योगिक वसाहतींची पायाभरणीही यावेळी प्रधानमंत्र्यांनी केली. इंदौर, रतलाम, गुणा, मैगंज, नर्मदापुरम अशा विविध ठिकाणच्या प्रकल्पांचा त्यात समावेश आहे. या प्रकल्पांमुळे २ लाखाहून जास्त रोजगार निर्मिती होणार आहे.

पेट्रोरासायनिक उत्पादनांसाठी बाहेरच्या देशांवरचं अवलंबित्व कमी करण्यासाठी केंद्र सरकार प्रयत्नशिल असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं.केंद्रीय हवाई वाहतूक मंत्री हरदीपसिंग पुरी आणि मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंग चौहान यांची भाषणं या कार्यक्रमात झाली. केंद्र सरकारनं गेल्या ९ वर्षात गरिबांसाठी केलेल्या विविध उपाय योजनांची माहिती प्रधानमंत्र्यांनी आपल्या भाषणात दिली. सनातन धर्माने देशाला समृद्ध वारसा दिला असून काहीजण त्यालाच नष्ट करु पाहत आहेत, अशी टिप्पण्णी मोदी यांनी केली. प्रधानमंत्र्यांनी सभेपूर्वी बीनामधे रोड शो केला.