शिक्षण, कृषी क्षेत्रांतील विकासासाठी ऑस्ट्रेलियाचे सहकार्य घेणार : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

 

मुंबई : उच्च शिक्षण आणि कृषी क्षेत्रांतील विकासासाठी ऑस्ट्रेलियाचे सहकार्य घेण्यात येईल, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. भारतातील ऑस्ट्रेलियाचे राजदूत फिलीप ग्रीन यांनी उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांची शासकीय निवासस्थानी भेट घेतली. यावेळी शिक्षण, कृषी आणि पर्यटन या विषयांवर चर्चा करताना उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस बोलत होते. यावेळी ऑस्ट्रेलियाच्या मुंबईतील उच्चायुक्त मॅजेल हिंद तसेच उपमुख्यमंत्री यांचे सचिव डॉ श्रीकर परदेशी उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले की, मुंबई, पुणे, नागपूर येथे विद्यार्थी मोठ्या संख्येने उच्च शिक्षणासाठी येत असतात. पुणे शैक्षणिक केंद्र असून, व्यावसायिक व तंत्रज्ञान शिक्षणक्रमांबरोबरच उच्च कौशल्याधिष्ठित शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्याही अधिक आहे. ऑस्ट्रेलियातील तज्ज्ञांद्वारे तयार करण्यात आलेल्या कौशल्य विकास अभ्यासक्रमाच्या साहाय्याने राज्यातील विद्यापीठात नवीन अभ्यासक्रम सुरू करण्यासाठी करार करण्यासंदर्भात विचार करण्यात येईल.

विविध क्षेत्रांतील उत्पादन, कृषी आणि सेवा या क्षेत्रांत मनुष्य बळाची मागणी जास्त आहे. तसेच, कृषी क्षेत्रात सौर ऊर्जा आणि त्यासंदर्भातील उत्पादनांची मागणी मोठ्या प्रमाणात आहे. ऑस्ट्रेलियातील अक्षय ऊर्जा निर्मिती आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा कृषी उद्योगात सहभाग करून अर्थव्यवस्था वाढीसाठी प्रयत्न करणार असल्याचेही उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी सांगितले. भारतातील विविधता, पर्यटन, व्यावसायिक आणि कौशल्य विकास संदर्भात चर्चा करून, शिक्षण, कृषी, उत्पादन क्षेत्रांत ऑस्ट्रेलियाचा सहभाग वाढवून, ‘मेक इन इंडिया’मध्ये योगदान द्यायला ऑस्ट्रेलियाला आवडेल, असे श्री. ग्रीन यांनी सांगितले.