बार्टीच्या योजनांसाठी निधी उपलब्ध करून देणार - केंद्रीय समाजकल्याण राज्यमंत्री रामदास आठवले

 

पुणे : डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी ) पुणे ही संस्था डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा समतेचा विचार जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी व अनुसूचित जातीच्या उत्थानासाठी काम करणारी तसेच संविधानाचा प्रचार व प्रसार करणारी राज्यशासनाची महत्वपूर्ण संस्था आहे. बार्टी संस्थेला कल्याणकारी योजनांसाठी राज्य व केंद्र सरकारकडून निधी उपलब्ध करून देणार असून संस्थेला निधी कमी पडू देणार नाही, असे प्रतिपादन केंद्रीय समाजकल्याण राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केले.

श्री.आठवले म्हणाले, बार्टीने अनुसूचित जातीतील तरुणांना प्रशिक्षण उपलब्ध करून द्यावे. अनुसूचित घटकांना न्याय द्यावा. बार्टीने डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी केलेल्या महान कार्याचे संशोधन करावे. बार्टी संस्थेने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे सर्व खंड व साहित्य तसेच भारतीय राज्यघटना, ज्येष्ठ विचारवंत विठ्ठल रामजी शिंदे, पँथर चळवळीतील पुस्तके उपलब्ध करून द्यावेत, अशा सूचना श्री. आठवले यांनी केल्या.

शासकीय विश्रामगृह येथे बार्टीचे महासंचालक सुनिल वारे यांनी संस्थेचा कामकाजाची आणि संस्थेतर्फे राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांची माहिती दिली. बॅरिस्टर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा वकिली प्रारंभ शताब्दी महोत्सव आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय परिषद बार्टी संस्थेच्यावतीने घेण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.