मुंबईत छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित भव्य संग्रहालय उभारणार - सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार

 

पुणे : महाराष्ट्र शासनातर्फे छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचे ३५० वे वर्ष विविध उपक्रमांच्या माध्यमातून साजरे करण्यात येत असून यानिमित्ताने मुंबई येथे ३० एकर जागेवर छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनकार्यावर आधारित भव्य संग्रहालय उभारण्यात येईल, असे प्रतिपादन राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले.

नऱ्हे येथील शिवसृष्टीला भेट दिल्यानंतर ते बोलत होते. श्री.मुनगंटीवार म्हणाले, शिवसंग्रहालय भव्यदिव्य आणि अत्याधुनिक संकल्पनेवर आधारित व्हावे, त्यातून शिवरायांचे संपूर्ण जीवन जगासमोर ठेवले जावे अशा सूचना विभागाला देण्यात आल्या आहेत. मुंबईत येणाऱ्या आंतरराष्ट्रीय प्रवाशांपर्यंतही महाराजांचे कार्य यानिमित्ताने पोहोचेल. महाराजांच्या जीवनाशी निगडित ८८ हजार वस्तू राज्यात विविध ठिकाणी आहेत, त्या एकाच ठिकाणी आणण्याचाही प्रयत्न संग्रहालयाच्या निमित्ताने होणार आहे.

शिवराज्याभिषेकाच्या ३५० व्या वर्षाच्या निमित्ताने प्रत्येकाच्या हृदयात शिवाजी महाराज प्रतिबिंबित व्हावे आणि त्यांच्या विचारावर आधारित कृती करण्याची ऊर्जा नागरिकांना मिळावी यासाठी हे आयोजन आहे. यानिमित्ताने सार्वजनिक उद्घोषणा यंत्रणेच्या (पीएएस) माध्यमातून दररोज ९.४५ वाजता मंत्रालयात छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारीत दिनविशेष आणि त्यांचे विचार प्रसारित करण्यात येणार आहेत.

शिवरायांच्या इतिहासाशी संबंधित १२ टपाल तिकिटे प्रकाशित करण्यात येणार आहेत. येत्या ९ ऑगस्टला शहाजी महाराजांवर आधारित टपाल तिकीट प्रकाशित करण्यात येईल. रिझर्व बँकेच्या माध्यमातून सोने, चांदी आणि तांब्याची 'होन' मुद्रा तयार करण्यात येईल. छत्रपतींची वाघनखे देण्याची विनंती ब्रिटिश म्युझिअमने मान्य केली आहे, जगदंबा तलवारही परत आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांवर आधारित चित्रपट महोत्सवाचेही आयोजन करण्यात येईल, अशी माहिती श्री.मुनगंटीवार यांनी दिली.