महाज्योती तर्फे पीएचडी संशोधकांना २४ कोटी रुपयांची अधिछात्रवृत्ती वितरीत

 

पुणे : महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था, नागपूर (महाज्योती) मार्फत इतर मागास वर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना पीएच.डी. अभ्यासक्रमासाठी सन २०२१ मध्ये निवड झालेल्या ६४८ विद्यार्थ्यांना आणि सन २०२२ मध्ये निवड झालेल्या १ हजार २३६ विद्यार्थ्यांना एकूण २४ कोटी १७ लाख ८७ हजार ७४९ रुपये इतकी इतकी अधिछात्रवृत्ती वितरित करण्यात आल्याची माहिती महाज्योतीने दिली आहे.

लक्षित गटातील उमेदवारांना संशोधनासाठी सहाय्य व्हावे, त्यांना संशोधन क्षेत्रात संधी मिळावी, त्यांचा विकास व्हावा या हेतूने महाज्योतीतर्फे पीएच.डी. अधिछात्रवृत्ती योजना राबविण्यात येते. विद्यार्थ्यांना अधिछात्रवृत्ती सोबत घारभाडे व आकस्मिक निधी देखील देण्यात येतो. अधिछात्रवृत्तीमुळे निश्चिंत होऊन संशोधनाचे कार्य करता येत असून संशोधनासाठी संदर्भ ग्रंथ खरेदी, अहवाल तयार करण्यासाठी प्रवास करता येतो. अभ्यासासाठी आवश्यक शैक्षणिक सुविधा उपलब्ध करुन देता येतात.

मान्यताप्राप्त विद्यापीठातील पदव्युत्तर पदवी परीक्षा उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना पीएच.डी. अधिछात्रवृत्ती योजनेअंतर्गत लाभ घेता येतो. योजनेच्या शर्तीनुसार नॉनक्रिमिलेअर उत्पन्न गटातील इच्छुक विद्यार्थ्यांकडून विहीत नमुन्यातील अर्ज https://mahajyoti.org.in या संकेतस्थळावर केवळ ऑनलाईन पद्धतीने मागविण्यात येतात. पीएच.डी. अधिछात्रवृत्ती योजनेचा अधिकाधिक विद्यार्थ्यांनी लाभ घेऊन संशोधन कार्यात करिअर घडविण्याचे आवाहनही महाज्योतीतर्फे प्रकल्प व्यवस्थापकांनी केले आहे.