स्थानिक चलनात व्यवहार करण्यासाठी तसंच UPI ला IPP शी जोडण्यासाठी भारत आणि संयुक्त अरब अमिरातीमध्ये सामंजस्य करार

 

नवी दिल्ली : भारत आणि संयुक्त अरब अमिराती यांच्या आज बँकिंग आणि शिक्षण क्षेत्रातल्या ३ सामंजस्य करारांवर स्वाक्षरी झाली. स्थानिक चलनाचा वापर दोन्ही देशांमधल्या व्यवहारांसाठी करणं तसंच पैसे हस्तांतरण करण्याची दोन्ही देशांची यंत्रणा एकमेकांशी जोडण्यासाठी दोन्ही देशांनी करार केले. यामुळं भारताची UPI आणि अमिरातीचं IPP ही प्रणाली परस्परांना जोडली जाईल. भारतीय रिझर्व बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास आणि युएईच्या मध्यवर्ती बँकेचे गव्हर्नर खालिद मोहम्मद बलामा यांनी आज याबाबतच्या सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली. आयआयटी दिल्लीचं उपकेंद्र अबुधाबीमध्ये सुरू करण्यासाठीही आज दोन्ही देशांमध्ये करार झाला. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि संयुक्त अरब अमिरातीचे अध्यक्ष शेख मोहम्मद बिन झायेद अल नह्यान यांनी आज द्विपक्षीय चर्चाही केली. यात गुंतवणूक, व्यापार, आर्थिक तंत्रज्ञान, ऊर्जा, नवीकरणीय ऊर्जा, वातावरण बदल, उच्च शिक्षण यासारख्या विषयांवर चर्चा झाली. 

करार अंमलात आल्यावर दोन्ही देशातल्या सर्व चालू खात्यातले आणि अनुमती प्राप्त भांडवली खात्यांतले व्यवहार स्थानिक चलनात व्यवहार होऊ शकतील. या करारामुळे उभय देशातल्या परस्पर गुंतवणुकीलाही चालना मिळेल. रुपे कार्ड आणि युएईचं कार्ड जोडण्यासाठी आणि त्यावर परस्पर व्यवहार करण्यासाठीही दोन्ही मध्यवर्ती बँकांनी सहमती दर्शवली. या करारामुळे आंतरराष्ट्रीय देवाणघेवाण सुलभ होईल आणि परस्पर आर्थिक सहकार्याला चालना मिळेल असं प्रधानमंत्री मोदी यावेळी म्हणाले. भारत युएई दरम्यान चा व्यापार शंभर अब्ज डॉलर्सचं उद्दिष्ट ओलांडेल असा विश्वास यावेळी उभय नेत्यांनी व्यक्त केला. दोन देशांचा दौरा आटोपून प्रधानमंत्री मायदेशी परतण्यासाठी अबुधाबी इथून रवाना झाले.