जागतिक अन्नधान्य बाजारपेठेतला भारताचा वाटा २०२२ मध्ये ७.७९ टक्क्यांवर पोचला

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) जागतिक अन्नधान्य बाजारपेठेतला भारताचा वाटा २०२२ मध्ये ७ पूर्णांक ७९ शतांश टक्क्यांवर पोचला आहे. संयुक्त राष्ट्रांच्या वाणिज्य व्यापारविषयक आकडेवारीच्या हवाल्यानं वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयानं ही माहिती दिली आहे. गेल्या काही वर्षांमध्ये भारताची अन्नधान्याची निर्यात सातत्यानं वाढत असून, त्यामुळे जागतिक अन्नधान्याच्या निर्यातीत भारताचा वाटा वाढत आहे, असं मंत्रालयानं म्हटलं आहे.

२०१० मध्ये भारताची निर्यात ३ पूर्णांक ३८ शतांश टक्के होती, ती २०२२ मध्ये ७ पूर्णांक ७९ टक्क्यांवर पोचली आहे. कृषी उत्पादनांची निर्यात वाढवण्यासाठी सरकारनं राज्यं आणि जिल्हा पातळीवर अनेक पावलं उचलली आहे. देशपातळीवर आणि विविध उत्पादनांनुसारसुद्धा निर्यातवाढीसाठी विविध योजना आखण्यात आल्या आहेत.