पुराचं पाणी घरात शिरल्यानं झालेल्या नुकसानीची मदत प्रतिकुटुंब ५ हजारवरुन १० हजार रुपये केल्याची अजित पवार यांची विधीमंडळात घोषणा

 

मुंबई (वृत्तसंस्था) : पुराचं पाणी घरात शिरल्यानं झालेल्या नुकसानीपोटी दिली जाणारी ५ हजार रुपयांची तातडीची मदत वाढवून ती प्रतिकुटुंब १० हजार रुपये केल्याची घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज विधीमंडळाच्या दोन्ही सभागृहात केली.  सर्व जिल्हाधिकाऱ्यांशी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे संपर्क साधून संपूर्ण राज्यातल्या अतिवृष्टी आणि पुरस्थितीचा आढावा घेतला जाईल, असं त्यांनी सांगितलं. गेल्यावर्षीच्या नुकसान भरपाईकरता ८ हजार ६७७ कोटी, तर यंदा ५१३ कोटींचा निधी वितरीत करण्यास शासनानं मान्यता दिली आहे.  धोकादायक परिस्थिती असलेल्या भागातल्या नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवावं, तसंच  पुरस्थितीमूळे मृत्यू पावलेल्या व्यक्तींच्या कुटुंबांना प्रत्येकी चार लाख रुपयांची मदत तातडीनं द्यावी, अशा सूचना दिल्याचंही त्यांनी सांगितलं.