राज्यात कोणत्याही प्रकारची कंत्राटी पोलीस भरती होणार नाही - देवेंद्र फडणवीस

 

मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यात कोणत्याही प्रकारची कंत्राटी पोलीस भरती होणार नाही, असं स्पष्टीकरण उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज  विधानसभेत दिलं , नाना पटोले यांनी हा मुद्दा उपस्थित केला होता.नाशिक जिलह्यातल्या इगतपुरी तालुक्यात आदिवासी गर्भवती महिलेला वेळेवर उपचार न मिळाल्याने तिचा मृत्यू झाला, तसेच पालघर जिल्ह्यात अन्य गर्भवती आदिवासी महिलेला पुराच्या पाण्यातून वैद्यकीय मदतीसाठी जावं लागलं या मुद्द्यावर विधानसभेत दिलेला स्थगन प्रस्ताव अध्यक्षांनी नाकारला त्यामुळे विरोधकांनी सभात्याग केला.यावर सरकार ने निवेदन करावं अशी सूचना अध्यक्षांनी दिली होती. आम्ही हा विषय गांभीर्याने घेऊन निवेदन करू आणि गरज वाटल्यास सभागृहात चर्चा करू असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं. विरोधकांनी या विषयावर राजकारण करू नये असं त्यांनी म्हटलं होतं. मात्र सरकार विरोधी घोषणा देत विरोधकांनी सभात्याग केला.

मुंबईतल्या राज्यातल्या सफाई कामगारांना कायमस्वरूपी घरे देण्यासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक बोलावली जाईल आणि या बैठकीसाठी मुंबईतल्या सर्व लोकप्रतिनिधींना निमंत्रित केले जाईल, असं आश्वासन उद्योग मंत्री उदय सामंत यांनी आज विधान परिषदेत दिलं. भाई गिरकर यांनी एका लक्षवेधी सूचनेच्या माध्यमातून सफाई कामगारांच्या घरांचा प्रश्न उपस्थित केला होता. मॅनहोलमध्ये उतरलेल्या कामगारांचा गुदमरून मृत्यू होण्याच्या दुर्घटना टाळण्यासाठी सफाई कामगारांना अत्याधुनिक साधने द्यावीत, अशी मागणी गिरकर यांनी केली. सचिन अहिर यांनीही सफाई कामगारांच्या घरांचा प्रश्न उपस्थित केला.  गोपीचंद पडळकर यांनी पुण्यातल्या एका रूग्णालयातल्या अग्नीशमन यंत्रणा बसवण्याच्या प्रकरणात एका फायर ऑफिसरने भ्रष्टाचार केल्याचा मुद्दा अन्य एका लक्षवेधी सूचनेच्या माध्यमातून उपस्थित केली. उद्योगमंत्री सामंत यांनी या अधिकाऱ्याची ३० दिवसांच्या आत चौकशी केली जाईल आणि तोपर्यंत संबंधित अधिकाऱ्याला सक्तीच्या रजेवर पाठवले जाईल, असे जाहीर केले.