केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाने एका लाचखोरी प्रकरणी पाच जणांना अटक

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाने एका लाचखोरी प्रकरणी पश्चिम मध्य रेल्वेचा एक उपमुख्य अभियंता, एक उपव्यवस्थापक आणि राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या एका प्रकल्प संचालकासह पाच जणांना काल अटक केली. एका खासगी कंत्राटदाराचं प्रलंबित असलेलं प्रकरण निकाली काढून बांधकामाला सुरुवात करण्यासाठी आणि काही बिलं मंजूर करण्यासाठी त्याच्याकडून लाच मागितल्याप्रकरणी त्यांच्या विरोधात तक्रार दाखल करून घेण्यात आली होती.

या प्रकरणाच्या तपासादरम्यान सीबीआयने भोपाळ, जबलपूर, कटनी, छिंदवाडा, इंदूर, रेवा इथं 13 ठिकाणी छापे टाकले आणि मालमत्तेच्या कागदपत्रांसह विविध कागदपत्रं जप्त केली. या प्रकरणी अटक करण्यात आलेल्या सर्वांना काल न्यायालयापुढे हजर करण्यात आलं आणि न्यायालयाने त्यांना 28 जुलैपर्यंत पोलिस कोठडी सुनावली.