'शासन आपल्या दारी' हा उपक्रम सर्वसामान्यांच्या सोयीसाठी - मुख्यमंत्री

 

मुंबई (वृत्तसंस्था) : सर्वसामान्य नागरिकांच्या सोयीसाठी 'शासन आपल्या दारी' हा उपक्रम राबवला जात असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं. गडचिरोलीत काल 'शासन आपल्या दारी' उपक्रमाचं उद्घाटन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झालं त्यावेळी ते बोलत होते. या उपक्रमाद्वारे ६०० कोटी रुपयांच्या योजनांचा लाभ देण्यात येत असून, हे ऐतिहासिक काम असल्याचं मुख्यमंत्री म्हणाले. गडचिरोली जिल्ह्यातल्या कोनसरी इथल्या लोहप्रकल्पातून २० हजार गरजूना रोजगार मिळणार असल्याचं मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितलं.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यावेळी बोलतांना, गडचिरोली जिल्ह्यातली रिक्त पदं लवकरच भरण्यात येतील असं सांगितलं तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गडचिरोली जिल्ह्यात औद्योगिक क्रांती आणण्याचा संकल्प सरकारनं केला असून, वैद्यकीय महाविद्यालयासाठी १४६ हेक्टर जागा प्रस्तावित केल्याचं सांगितलं. गडचिरोली इथं विमानतळ व्हावं यासाठीचा प्रस्ताव विमानतळ प्राधिकरणाकडे पाठवल्याची माहितीही फडणवीस यांनी दिली. मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना दोन वर्षात कार्यान्वित होणार असून, त्यांतर शेतकऱ्यांना पूर्णवेळ पाणी मिळेल असंही त्यांनी यावेळी सांगितलं.