हरवलेल्या मुलांच्या शोधासाठीच्या ऍपच्या माध्यमातून 4 लाख मुलांचा शोध - स्मृती इराणी

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात पळवण्यात आलेल्या मुलांपैकी चार लाख मुलांची मुक्तता करण्यात आली असून, त्यांना कुटुंबीयांकडे सुरक्षित पाठवण्यात आलं आहे, अशी माहिती सरकारनं दिली. महिला आणि बालविकास मंत्री स्मृती इराणी यांनी काल मुंबईत बालसुरक्षा, बाल सुरक्षितता आणि बालकल्याण या विषयावरील एका चर्चासत्रात बोलताना ही माहिती दिली. मुलांची मुक्तता करण्याबाबत ट्रॅक द मिसिंग चाइल्ड म्हणजे हरवलेल्या मुलाचा माग काढा या संकेतस्थळानं बजावलेल्या कामगिरीची इराणी यांनी प्रशंसा केली. हरवलेल्या किंवा धोका असलेल्या मुलांचा माग काढण्याबाबत हे संकेतस्थळ काम करतं. विविध सरकारी खात्यांच्या सहकार्यातून देशात अडीच हजार मुलं दत्तक देण्यात आल्याची माहिती इराणी यांनी दिली.

ज्या प्रदेश आणि जिल्ह्यांमध्ये लहान मुलांबाबतच्या गुन्ह्यांचं प्रमाण जास्त आहे, तिथं बालकल्याण संस्था नसल्यास किंवा अशा संस्थांची अतिरिक्त गरज असल्यास त्यांची स्थापना करण्यासाठी सरकार सर्वतोपरी पाठबळ देईल, अशी ग्वाही त्यांनी दिली. संबंधितांनी या संदर्भात सरकारला कळवावं म्हणजे संस्थांच्या उभारणीबाबत उपाय योजता येतील, असं त्यांनी नमूद केलं. ज्या ठिकाणी बालकल्याण समित्यांची कार्यालयं नसतील तिथं त्यांच्या उभारणीबाबतही सरकार पाऊलं उचलेल, असं त्या म्हणाल्या.