मतभेद विसरून देशहितासाठी सर्वांनी एकत्र येण्याचं राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार यांचं आवाहन

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) बिहार मधल्या पाटणा इथं आज १५ विरोधी पक्षांच्या ३० हून अधिक नेत्यांची पहिली उच्चस्तरीय बैठक झाली. 2024 च्या लोकसभा निवडणुकांमधे भाजपाच्या विरोधात एकत्रित आघाडी उघडण्याच्या दृष्टीने या बैठकीत चर्चा झाली. जागावाटपावर पुढच्या सिमला इथं होणाऱ्या बैठकीत चर्चा करू, असं बैठकीचे निमंत्रक आणि बिहारचे मुख्यमंत्री, संयुक्त जनता दलाचे नेते नितीश कुमार यांनी बैठकीनंतर झालेल्या वार्ताहर परिषदेत सांगितलं.

त्यांनी भाजपावर जोरदार टीका केली. आपापसातले मतभेद विसरून पुढे जाऊ, देशहितासाठी सर्वांना एकत्र यावं लागेल, असं राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार म्हणाले. राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्याध्यक्ष सुप्रिया सुळे आणि प्रफुल्ल पटेल देखील बैठकीला उपस्थित होते. प्रत्येक राज्यात वेगवेगळ्या मुद्द्यांवर निवडणूक लढणार असूून किमान समान कार्यक्रम तयार करू असं काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी सांगितलं. भारताच्या मूलभूत जडण घडणीवर भाजपा आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं आक्रमण सुरू आहे. विविध पक्षांच्या विचारसरणीत फरक असला तरी ते सर्व एकत्र येतील असा विश्वास काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी व्यक्त केला. देशातल्या हुकूमशाही विरोधातली ही लढाई असून देशाची एकता ठेवण्यासाठी एकत्र असल्याचं माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी वार्ताहर परिषदेत सांगितलं.

त्याच्यासमवेत त्यांच्या शिवसेना गटाचे खासदार संजय राऊत आणि राज्याचे माजी पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे उपस्थित होते. देशात भाजपाची हुकुमशाही सुरू असून देशहितासाठी जनआंदोलन सुरू केल्याचं तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी सांगितलं. जम्मू काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री पीपल्स डेमॉक्रॅटिक पक्षाच्या नेत्या मेहबूबा मुफ्ती, जम्मू काश्मीरचे माजी मुख्यमंत्री आणि नॅशनल कॉन्फरन्सचे ओमार अब्दुल्ला, भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे सरचिटणीस सीताराम येचुरी, भारतीय मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे सरचिटणीस डी राजा, आम आदमी पक्षाचे प्रमुख आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान, तमिळनाडूचे मुख्यमंत्री आणि द्रमुकचे अध्यक्ष एमके स्टॅलिन, पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान, समाजवादी पक्षाचे अध्यक्ष आणि उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव बैठकीला उपस्थित होते. झारखंड मुक्ती मोर्चाचे हेमंत सोरेन, राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष लालूप्रसाद यादव हेही बैठकीला उपस्थित होते. सीपीआय एमएल नेतेही या बैठकीत सहभागी झाले होते. बसपा अध्यक्ष मायावती यांना बैठकीचं आमंत्रण नसल्यामुळे त्या अनुपस्थित होत्या. तर राष्ट्रीय लोक दलाचे अध्यक्ष जयंत चौधरी हेही बैठकीला आले नाहीत.