समान संधी केंद्रे विद्यार्थ्यांच्या प्रगतीचा आधार : डॉ. प्रशांत नारनवरे

 

पुणे : विद्यार्थ्यांनी आपले ध्येय निश्चित करावे. विज्ञान व तंत्रज्ञान क्षेत्रात अनेक संधी आहेत. त्यामुळे भविष्यातील संधी ओळखून नियमित अभ्यास करून आधुनिक तंत्रज्ञान आत्मसात करावे. त्यासाठी पालक व शिक्षकांनी विद्यार्थ्यांना सतत दिशादर्शक मार्गदर्शन करण्याची गरज आहे. राज्यातील महाविद्यालयांमधील मागासवर्गीय मुला-मुलींना शिष्यवृत्ती, फ्रीशिपसह इतर योजना आणि स्पर्धा परीक्षा मार्गदर्शनासोबतच उद्योजकता व्यवसाय व रोजगार निर्मितीसाठी मार्गदर्शन करण्यात येणार आहे. त्यासाठी समाज कल्याण विभागाकडून विद्यार्थ्यांसाठी ‘समान संधी केंद्रे’ स्थापन करण्यात येणार आहेत. अशी माहिती समाज कल्याण आयुक्तालय, आयुक्त डॉ. प्रशांत नारनवरे, (भा.प्र.से.) यांनी दिली.

"ज्ञान ही शक्ती आहे, माहिती म्हणजे स्वातंत्र्य तर शिक्षण हा प्रत्येक कुटुंब आणि समाजाच्या प्रगतीचा आधार आहे..."

विद्यार्थ्यांचे सामान्य जीवन सद्या गुंतागुंतीचे बनत आहे. बदलत्या परिस्थितीत विद्यार्थ्यांच्या जीवनाला योग्य दिशा देण्यासाठी मार्गदर्शन महत्वाचे ठरते. शिक्षण क्षेत्रात देखील आज आपण खूप बदल होतांना बघत आहोत. नवनवीन अभ्यासक्रम, व्यवसाय, विशेषीकरण यामुळे विद्यार्थ्यांना आपल्या समस्यांचे निराकरण करण्यात अडचणी येतात. यासाठी नवीन माध्यमांचा शोध घेण्यासाठी मार्गदर्शन उपयुक्त ठरते. मागासवर्गीय समाजातील मुला-मुलींना शिष्यवृत्ती, फ्री-शिपसह इतर योजना आणि स्पर्धा परीक्षेसह उद्योजकता, व्यवसाय व रोजगार निर्मितीसाठी मार्गदर्शन करण्याच्या उद्देशाने समाज कल्याण विभागाकडून ‘समान संधी केंद्र’ स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार प्रत्येक महाविद्यालयात किमान एक प्राध्यापक आणि सहाय्यक म्हणून काही विद्यार्थ्यांची मदत घेऊन ‘समान संधी केंद्र’ सुरू करण्यात आले. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक विकास आणि रोजगार निर्मितीच्या दृष्टिकोनातून राज्य सरकारने या केंद्राच्या माध्यमातून उपाययोजना करण्याचे ठरवले आहे. ‘समान संधी केंद्र’च्या माध्यमातून विद्यार्थ्यांना त्यांच्या पुढील शिक्षणासाठी शासन प्रोत्साहन देणार आहे. यासोबतच उद्योजक निर्मिती किंवा व्यावसायिक होण्यासाठी कौशल्य शिक्षणासह सर्वसमावेशी मार्गदर्शन करण्यात येणार आहे.
सामाजिक न्याय विभागाच्या या योजनेचे सर्वच स्तरातून स्वागतही करण्यात येत आहे.

उच्च माध्यमिक, कनिष्ठ महाविद्यालय, वरिष्ठ महाविद्यालय आणि इतर सर्व शैक्षणिक संस्थांच्या सर्व महाविद्यालयांमध्ये ‘समान संधी केंद्र’ सुरु करण्याचे उद्दिष्ट आहे. प्रत्यक्ष महाविद्यालये सुरू नसली तरी प्रत्येक महाविद्यालयात केंद्राची स्थापना करण्याचे निर्देश तसे देण्यात आलेले आहेत. यामध्ये समन्वय अधिकाऱ्यांची नियुक्ती करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप आणि समाज माध्यमांचा वापर करून संबंधित महाविद्यालयातील मागासवर्गीय विद्यार्थ्यांशी समन्वय साधाण्याची सूचना सामाजिक न्याय विभागाच्या वतीने देण्यात आले आहेत.

विद्यार्थ्यांना इतर जण कसे वागवतात, यापेक्षा त्याला स्वतःला, स्वतःबद्दल कसे वाटते, ते जाणणे आणि त्यावर काम करणे, हे शिक्षकांनी महत्त्वाचे मानायला हवे. आपण कोणीतरी वेगळे आहोत, सर्वांपेक्षा माझ्यात काही विशेष गुण आहेत, हे मुलांना जाणवून देण्यामुळे मुलांच्या इतर क्षेत्रातल्या कामगिरीवर मोठाच परिणाम होतो. याच बरोबरीने मुले अहंकारी होत नाहीत ना, वागणे बोलणे, उद्दामपणाचे होत नाही ना, या सीमारेषा सांभाळणेही तितकेच आवश्यक असते. विद्यार्थ्यांच्या शारीरिक, मानसिक आणि भावनिक प्रगतीतील अडथळे, त्याची कारणे, निदान, उपचार मार्गदर्शन आणि योग्य समुपदेशन 'समान संधी केंद्रा' द्वारे होवू शकते.
मानव एक अमूल्य संसाधन आहे. या संसाधनाची वाढ, विकास संवेदनशील आणि जाणीवपूर्वक रीतीने होण्याची गरज आहे. मागासवर्गीय मुला-मुंलीना उद्योजकता व्यवसाय व रोजगार निर्मितीसाठी आर्थिक न्यायासाठी मार्गदर्शन, विद्यार्थ्यांना त्यांच्या पुढील शिक्षणासाठी प्रोत्साहित करणे, रोजगार प्राप्तीसाठी किंवा उद्योजकता, व्यावसायिक, कौशल्य शिक्षण आदि महत्वाकांक्षी उपक्रम "समान संधी केंद्र"च्या माध्यमातून राबविले जाणार आहे.
शाळांमधील करिअर समुपदेशनाची सध्याची प्रणाली आणि मुख्य शिक्षण आणि सर्वोत्तम पद्धती नेमकी काय आहेत या सर्व बांबीचा विचार करूनच "समान संधी केंद्र" उभारण्याचा शासनाने निर्धार केला आहे. व्यावसायिक शिक्षणाबाबत असलेल्या धारणा पासून मुक्त करण्यासाठी आणि त्या महत्त्वाकांक्षी बनवण्यासाठी सर्व संबंधितांकडून एकत्रित प्रयत्न होणे आवश्यक आहे.

महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील सर्व उच्च माध्यमिक, कनिष्ठ महाविद्यालय, वरिष्ठ महाविद्यालय, इतर सर्व शैक्षणिक संस्था व त्यांच्या अधिपत्याखाली येणार्‍या सर्व महाविद्यालयांमध्ये 'समान संधी केंद्रे' तत्काळ सुरू करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. त्यासाठी प्रत्येक महाविद्यालयाने समान संधी केंद्राची स्थापना करून महाविद्यालयनिहाय समन्वय अधिकारी यांची नियुक्ती करावी, त्यासाठी व्हॉट्सअप ग्रुप तयार करावा किंवा इतर समाज माध्यमांचा वापर करून संबंधित महाविद्यालयातील प्रवेशित मागासवर्गीय विद्यार्थ्यांशी समन्वय करावा, विद्यार्थ्यांना त्यांच्या क्षमतेनुसार शिक्षणाची संधी प्रदान करणे, ‘समान संधी केंद्रा’चे उद्दिष्ट्य आहे.