राज्यात अनेक जिल्ह्यात युवाशक्ती करीअर शिबीरांचं आयोजन

 

मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यात आज अनेक जिल्ह्यात युवाशक्ती करीअर शिबीरांचं आयोजन करण्यात आलं. अकोला इथं उपमुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांनी दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून युवाशक्ती करीअर शिबीराचं उद्घाटन केलं. तज्ज्ञ मान्यवरांनी युवक युवतींना  समुपदेशन, रोजगारांच्या संधी, नवीन तंत्रज्ञान आणि करिअर याविषयी शिबीरात मार्गदर्शन केलं. व्यवसाय शिक्षण आणि प्रशिक्षण संस्था तसंच जिल्हा कौशल्य विकास रोजगार आणि मार्गदर्शन केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने शिबीराचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांसह अनेक वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

यवतमाळ इथं अन्न आणि औषध प्रशासन मंत्री संजय राठोड यांनी युवाशक्ती करिअर शिबिराचं उद्घाटन केलं. नेमक्या कोणत्या क्षेत्रात करियर करावं हे ठरवताना विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन मिळणं आवश्यक असल्याचं ते यावेळी म्हणाले.यवतमाळ जिल्ह्यातल्या विद्यार्थ्यांनी या करियर मार्गदर्शन शिबिराचा लाभ घेऊन आपल्या आयुष्याला आकार द्यावा असं त्यांनी सांगितलं. यावेळी जिल्हाधिकारी अमोल येडगे, जिल्हा व्यवसाय शिक्षण आणि प्रशिक्षण अधिकारी गजानन राजुरकर आदी उपस्थित होते. या शिबिरात मोठ्या प्रमाणात विद्यार्थी सहभागी झाले होते.