शरद पवार यांच्या राजीनाम्यानंतर पक्षातील अनेकांचे राजीनामे

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा आपण दिलेला नाही असं जयंत पाटील यांनी स्पष्ट केलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी काल आपल्या अध्यक्ष पदाच्या राजीनाम्याची घोषणा केली. पवारांनी आपला हा निर्णय बदलावा या मागणीसाठी पक्षाच्या विविध पदाधिकाऱ्यांनीही राजीनाम्याचे इशारे दिले. त्यात जयंत पाटील यांनीही प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्याच्या वावड्या उठल्या. पण, जयंत पाटील यांनी आपल्या कोणत्याही पदाचा राजीनामा दिला नसल्याचं त्यांच्या कार्यालयानं कळवलं आहे. शरद पवार यांच्या धक्कादायक निर्णयाच्या पार्श्वभूमीवर पक्षाच्या राष्ट्रीय सरचिटणीस पदाचा राजीनामा देत असल्याचं राष्ट्रवादीचे नेते आणि आमदार जितेंद्र आव्हाड यांनी जाहीर केलं आहे.

ठाण्यातल्या इतर सर्व पदाधिकाऱ्यांनी आपल्या पदाचे राजीनामे दिले असल्याचं टि्वट आव्हाड यांनी केलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पदाचा राजीनामा दिल्याचं काल जाहीर केल्यानंतर पक्ष कार्यकर्त्यांमधे धक्का बसल्याच्या प्रतिक्रीया उमटल्या आहेत. पवार यांनी राजीनामा मागे घ्यावा, अशी मागणी करणारे फलक राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी अनेक ठिकाणी लावले आहेत.