‘मिशन कर्मयोगी भारत’मुळे प्रशासकीय कामकाज अधिक गतिमान होईल- एस. रामादुराई

 


मुंबई : ‘‘शिकणे हा जीवनाचा अविभाज्य भाग आहे. त्यामुळे शिकण्याला आपला जीवन प्रवास बनवावे. शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी डिजीटल तंत्रज्ञानाच्या साहाय्याने ‘मिशन कर्मयोगी भारत’ अंतर्गत विविध ऑनलाईन अभ्यासक्रम चालविण्यात येत आहे. या माध्यमातून यंत्रणेत काम करणाऱ्यांमध्ये  क्षमता वृद्धीसह प्रशासकीय कामकाज गतिमान होण्यास सहाय्य होईल’’, असा विश्वास मिशन कर्मयोगी भारतचे अध्यक्ष एस. रामादुराई यांनी आज व्यक्त केला.

मंत्रालयातील परिषद सभागृहात सामान्य प्रशासन विभागाच्यावतीने ‘कर्मयोगी भारत’ चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले. चर्चासत्रातील दुपारच्या सत्राला संबोधित करताना श्री. रामादुराई बोलत होते. व्यासपीठावर मिशन कर्मयोगी भारतचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिषेक सिंग, कॅपॅसिटी बिल्डींग कमिशनचे सचिव हेमांग जानी, प्रशासक प्रवीण परदेशी, अप्पर मुख्य सचिव श्रीमती सुजाता सौनिक, एनआयसीचे राज्य माहिती अधिकारी श्री. पारीसनी, अर्थ व सांख्यिकी संचालनालयाचे संचालक विजय आहेर उपस्थित होते.

श्री. रामादुराई म्हणाले की, देशात सध्या चलनरहीत, पेपररहीत सेवा उपलब्ध आहे. त्यानुसार शासकीय सेवेतही भविष्याचा विचार करून प्रशासकीय यंत्रणेत क्षमता निर्माण करणे गरजेचे आहे. पुढे चॅट जीपीटी, कृत्रिम बुद्धीमत्तेचे जग आहे. त्यामुळे त्या पद्धतीचे मनुष्यबळ शासनात असावे. मिशन कर्मयोगी भारतचा उद्देशच ‘रूलबेससह रोलबेस इंडिया’ निर्माण करणे आहे. त्यानुसारच कर्मयोगी भारत मिशन अंतर्गत आयजीओटी (iGOT-Integrated Government online Training) या कर्मयोगीच्या प्लॅटफॉर्मवर ऑनलाईन प्रशिक्षणासाठी विविध अभ्यासक्रम उपलब्ध आहे. या अभ्यासक्रमांचा लाभ घेवून आपली क्षमता वृद्धी करावी.

मिशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. सिंग यावेळी म्हणाले की, मिशन कर्मयोगी भारतला महाराष्ट्रात संधी मिळाली आहे. हे मिशन गुड गव्हर्नन्ससाठी आहे. शासकीय योजनांमध्ये प्रभावी अंमलबजावणीसाठी अधिकारी व कर्मचाऱ्यांचे कौशल्य विकसित करणे गरजेचे आहे. कौशल्य विकसित करून यंत्रणेला सक्षम करण्याचे काम मिशन कर्मयोगी भारतमधून होत आहे. राज्याच्या गरजा, नियम, कायदे व भाषेला अनुसरून अभ्यासक्रम आहे. आय गॉट प्लॅटफॉर्मवर 4 लाख 60 हजार हून अधिक लोकांची नोंदणी झाली आहे. शासनात दर्जेदार काम होण्यासाठी कर्मयोगी भारतचा उपयोग होणार आहे.

चर्चासत्रादरम्यान सचिव श्री. जानी यांनी मिशन कर्मयोगी भारत सोबत सामजंस्य करार करणारे महाराष्ट्र हे पहिले राज्य असल्याचे सांगितले. प्रशासक श्री. परदेशी यांनी  शासनात काम करताना बदली झाल्यानंतर किंवा नवीन जबाबदारी मिळाल्यानंतर नवे ज्ञान, माहिती असणे आवश्यक असते. त्यासाठी प्रशिक्षणाची प्रक्रिया निरंतर सुरू पाहिजे. अन्यथा प्रभावी काम होत नाही. त्यामुळे आयजीओटी (iGOT-Integrated Government online Training) हे कर्मयोगी प्लॅटफॉर्म उपयुक्त असून यामध्ये आरटीआय, पार्लमेंटरी प्रोसीजर, नोटींग अँड ड्राफ्टींग,फायनान्सीयलसारखे उपयुक्त कोर्सेस उपलब्ध असल्याचे  सांगितले.

अप्पर मुख्य सचिव श्रीमती सौनिक यांनी नवीन जबाबदारी मिळाल्यानंतर ‘माईंड सेट’ व्हायला वेळ लागतो. त्यासाठी मिशन कर्मयोगी भारत निश्चितच मदत करेल. यामध्ये विविध प्रशिक्षणे आहेत. ते वेळेनुसार अधिकारी घेवू शकतात.