देशाच्या विकास प्रक्रियेला गती देण्यासाठी तंत्रज्ञान हे एक साधन असल्याचं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन

 


नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशाच्या विकास प्रक्रियेला गती देण्यासाठी तंत्रज्ञान हे एक साधन असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. ते आज नवी दिल्ली इथल्या प्रगती मैदानावर आयोजित  राष्ट्रीय तंत्रज्ञान सप्ताह २०२३, ‘स्कूल टू स्टार्टअप, इग्नाइटिंग यंग माइंड्स टू इनोव्हेट’, या उपक्रमाचं उदघाटन करताना बोलत होते. आर्थिक विकास, तसंच शाश्वत विकासाची  उद्दिष्ट गाठण्यासाठी आणि सर्वसमावेशक परिसंस्था निर्माण करण्यासाठी तंत्रज्ञान आवश्यक असल्याचं ते यावेळी म्हणाले. तंत्रज्ञान हे आपलं वर्चस्व सिद्ध करण्याचं माध्यम नव्हे, तर देशाच्या विकासाला गती देण्याचं साधन आहे, यावर भारताचा विश्वास असल्याचं प्रधानमंत्री म्हणाले. राष्ट्रीय तंत्रज्ञान दिनानिमित्त, प्रधानमंत्र्यांनी आज देशातल्या ५ हजार ८०० कोटी रुपयांच्या विविध वैज्ञानिक प्रकल्पांची पायाभरणी आणि लोकार्पण केलं.

आज पायाभरणी केलेल्या प्रकल्पांमध्ये, महाराष्ट्रात मुंबईमधल्या टाटा मेमोरियल हॉस्पिटलचा प्लॅटिनम ज्युबिली ब्लॉक, हिंगोली जिल्ह्यातली लेझर इंटरफेरोमीटर ग्रॅव्हिटेशनल वेव्ह ऑब्झर्व्हेटरी - इंडिया, या प्रकल्पांचा समावेश आहे. तसंच, मुंबईमधली फिशन मॉलिब्डेनम-९९ उत्पादन सुविधा, नॅशनल हॅड्रॉन बीम थेरपी सुविधा आणि नवी मुंबई इथली महिला आणि मुलांच्या कर्करोग रुग्णालयाची इमारत, यासह विशाखापट्टणमधलं रेअर अर्थ पर्मनंट मॅग्नेट प्लांट आणि होमी भाभा कॅन्सर हॉस्पिटल आणि रिसर्च सेंटर, या प्रकल्पांचं प्रधानमंत्री मोदी यांनी आज लोकार्पण केलं. आजच्या दिवसांचं महत्व सांगणाऱ्या टपाल तिकिटाचं आणि नाण्याचं प्रधानमंत्र्यांनी आज प्रकाशन केलं तसंच स्वदेशी वैज्ञानिक आणि तांत्रिक प्रगती दर्शवणाऱ्या प्रदर्शनाचं उदघाटन केलं. आजचा भारत, नवीन विचार आणि सर्वंकष दृष्टिकोन बाळगत तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात पुढे जात आहे, असं प्रधानमंत्री म्हणाले. एकविसावं शतक हे भारताचं शतक असून, जग आपल्याकडे आशेचा किरण म्हणून पाहत आहे, असं संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यावेळी म्हणाले. विज्ञान आणि तंत्रज्ञान देशाच्या प्रगतीमध्ये महत्वाची भूमिका बजावत असून, सर्वाधिक उत्पादनक्षम लोकसंख्येचा आपल्याला लाभ मिळत असल्याचं ते म्हणाले. भारताने विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रात उल्लेखनीय प्रगती केली असून, आपला देश जगातली तिसरी सर्वात मोठी स्टार्टअप परिसंस्था ठरल्याचं केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्री डॉ. जितेंद्र सिंह यावेळी म्हणाले.