पुण्यातल्या एका शाळेच्या इमारतीवर राष्ट्रीय तपास संस्थेकडून कारवाई

 

मुंबई (वृत्तसंस्था) : राष्ट्रीय तपास संस्थेनं गेल्या रविवारी पुण्यातल्या एका शाळेचे दोन मजले ताब्यात घेतले. या ठिकाणी पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया हा गट मुस्लिम तरुणांना कट्टरपंथी बनवण्यासाठी, तसंच देशविरोधी कारवायांचं प्रशिक्षण देण्यासाठी शिबिरं आयोजित करत होता; यासाठी शाळेच्या चौथ्या आणि पाचव्या मजल्याचा वापर केला जात होता; असं एनआयएनं म्हटलं आहे. या प्रकरणी गेल्या वर्षी १३ एप्रिलला गुन्हा दाखल करण्यात आला होता.

गेल्या वर्षी २२ सप्टेंबर रोजी एनआयएनं या शाळेच्या दोन मजल्यांवर तपास मोहीम राबवली होती. यावेळी काही संशयास्पद कागदपत्र ताब्यात घेण्यात आले होते. राष्ट्रीय तपास संस्थेनं यावर्षी १८ मार्च रोजी नवी दिल्ली इथल्या एनआयए विशेष न्यायालयात पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियासह २० आरोपींविरुद्ध आरोपपत्र  दाखल केलं असल्याची माहिती एनआयएनं दिली आहे.