प्रधानमंत्र्याच्या हस्ते पहिल्या जागतिक बौद्ध शिखर परिषदेचे उद्घाटन

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : बुद्ध ही एखाद्या व्यक्तीमत्त्वा पलीकडची गहन समज असून, एक अमूर्त विचार आहे, असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. ते  आज नवी दिल्ली इथं जागतिक बौद्ध परिषदेचं बीजभाषण देताना बोलत होते. भगवान गौतम बुद्धांच्या उदात्त शिकवणीने अनेक शतकांपासून अगणित व्यक्तींना प्रभावित केलं आहे, असंही ते यावेळी म्हणाले. भगवान गौतम बुद्धांच्या शिकवणीमधून प्रेरणा घेऊन भारत जागतिक कल्याणासाठी नवे प्रयत्न करत आहे, आणि आपल्या नेतृत्वाखालच्या सरकारने भगवान बुद्धांच्या मूल्यांचा सातत्याने प्रसार केला आहे, असं प्रधानमंत्र्यांनी यावेळी सांगितलं.  

या अमृत काळात भारताने अनेक विषयांशी संबंधित नवीन उपक्रम हाती घेतले असून, भगवान बुद्ध हीच यामागची सर्वात मोठी प्रेरणा आहे, असं ते म्हणाले. भारताने जगाला युद्ध नव्हे, तर बुद्ध दिले, असं सांगून ते म्हणाले, कि जग आज जे युद्ध आणि अशांततेचा सामना करत आहे, त्यावर भगवान बुद्धांनी अनेक शतकांपूर्वीच उपाय सांगितला होता. भगवान बुद्धांनी दाखवलेला मार्ग, हाच  भविष्याचा मार्ग असल्याचं प्रधानमंत्री म्हणाले.