दर्जेदार आरोग्य सेवा सुनिश्चित करण्यासाठी काम करत राहण्याची प्रधानमंत्र्यांची ग्वाही

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : आरोग्य विषयक पायाभूत सुविधा वाढवून लोकांना दर्जेदार आरोग्य सेवा सुनिश्चित करण्यासाठी सरकार काम करत राहील, असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी 'जागतिक आरोग्य दिना' निमित्त एका ट्विटमध्ये म्हटलं आहे. समाज निरोगी बनवण्यासाठी काम करणाऱ्या सर्वांविषयी त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली आहे. 

१९४८ मध्ये जागतिक आरोग्य संघटनेची स्थापना झाल्याच्या स्मरणार्थ ७ एप्रिल हा दिवस जागतिक आरोग्य दिन म्हणून पाळला जातो. जागतिक आरोग्य दिन २०२३ ची संकल्पना 'सर्वांसाठी आरोग्य' अशी  आहे. यानिमित्त केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ मनसुख मांडविय यांनीही शुभेच्छा दिल्या आणि निरोगी भारत निर्माण करण्याच्या सरकारच्या वचनबद्धतेचा पुनरुच्चार केला.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातल्या जनतेला जागतिक आरोग्य दिनानिमित्त निरोगी आयुष्याच्या शुभेच्छा दिल्या आहेत. राज्यात सर्वसामान्य नागरिक केंद्रबिंदू ठेवून आरोग्यविषयक विविध योजना विविध पातळ्यांवर राबवल्या जात आहेत, असं त्यांनी म्हटलं आहे.  आरोग्यविषयक आव्हानाला ताकदीनं सामोरे जाणाऱ्या आरोग्य क्षेत्रातील डॉक्टर्स, नर्स, आरोग्य कर्मचारी यांचे मुख्यमंत्र्यांनी आभार मानले आहेत. 

राज्यात आठवडाभर 'सुंदर माझा दवाखाना' हा उपक्रम सुरू राहणार असून सामान्यांना दर्जेदार आणि गुणवत्तापूर्ण आरोग्य सेवा देण्याचं आवाहन मुख्यमंत्री शिंदे यांनी केलंय. शासकीय रुग्णालयं आणि आरोग्य संस्थांमध्ये सर्वांना समान सुविधा उपलब्ध करून, जास्तीत जास्त रुग्णांनी सार्वजनिक रुग्णांलयांच्या सुविधांचा वापर केला पाहिजे, याविषयी जनजागृती करणं हा या उपक्रमाचा उद्देश आहे. त्यासाठी सार्वजनिक आरोग्य विभाग राज्यातल्या सर्व सरकारी आरोग्य केंद्रांमध्ये स्वच्छता मोहीम राबवत ७ ते १४ एप्रिल दरम्यान हा उपक्रम राबवणार आहे.