महाराष्ट्रात अंगणवाडी सेविकांच्या मानधनात २० टक्के वाढ करण्याचं महिला बालविकास मंत्र्यांचं आश्वासन

 


मुंबई (वृत्तसंस्था) : अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांच्या मानधनात 20 टक्के वाढ करण्याचं आश्वासन आज महिला आणि बालविकास मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी विधानसभेत दिलं. प्रश्नोतराच्या तासात ते बोलत होते. या सेविकांना मोबाईल फोनचे संच देता यावे म्हणून 150 कोटींची तरतूद करणार असून अंगणवाड्यांच्या भाडे भत्त्यात वाढ करु असं लोढा यांनी सांगितलं.

अंगणवाड्याचे वीज बिल थेट सरकार भरणार असून त्यासाठी अर्थसंकल्पात तरतूद केली जाणार असल्याची माहिती त्यांनी दिली. अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांची 20 हजाराहून अधिक पदं येत्या मे पर्यंत भरण्याचं आश्वासनही त्यांनी दिलं.मुंबईत आज प्रायोगिक तत्त्वावर कंटेनर अंगणवाड्याचे उद्घाटन होणार असून 3 महिन्यात अशा 200 अंगणवाड्या सुरू केल्या जाणार असल्याचं लोढा म्हणाले.

अंगणवाडी सेविकांना किमान वेतन देण्याची मागणी विरोधी पक्षाच्या अनेक सदस्यांनी केली होती. या सेविका मानधनावर काम करतात. त्या पूर्णवेळ काम करत नाही. त्यामुळे त्यांना किमान वेतन देणं शक्य नसल्याचं लोढा यांनी स्पष्ट केलं. या उत्तरामुळे समाधान न झालेल्या विरोधी पक्षाच्या सदस्यांनी सभात्याग केला.