अदानी घोटाळ्यावरुन संसदेच्या दोन्ही सभागृहात आजही गदारोळ

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : अदानी समूहाच्या मुद्द्यावरून आज संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये विरोधी पक्षांनी गोंधळ घातला. राज्यसभेचे कामकाज दुपारी २ वाजेपर्यंत तर लोकसभेचे कामकाज दुपारी १२ वाजेपर्यंत तहकूब करण्यात आलं.

राज्यसभेत, दुपारी १२ वाजता पहिल्या तहकूबीनंतर सभागृहाचं कामकाज पुन्हा चालू झालं  तेव्हा काँग्रेस, आप, द्रमुक, राजद, बीआरएस, डावे आणि इतरांसह विरोधी सदस्यांनी पुन्हा गोंधळ घातला. आम आदमी पक्षाचे सदस्य हौद्यामध्ये  उतरले. गोंधळाच्या वातावरणात सभापती जगदीप धनखड यांनी प्रश्नोत्तराचा तास चालविण्याचा प्रयत्न केला पण तो निष्फळ ठरला.

त्यानंतर सभागृहाचे कामकाज दुपारी २ वाजेपर्यंत तहकूब करण्यात आले.तत्पूर्वी, दोन्ही सभागृहांनी तुर्की आणि सीरियामध्ये झालेल्या भीषण भूकंपात प्राण गमावलेल्या लोकांच्या स्मरणार्थ दोन मिनिटे मौन पाळले.