राज्य विधिमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन येत्या २७ फेब्रुवारीपासून

 

मुंबई (वृत्तसंस्था) : राज्य विधी मंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन येत्या २७ फेब्रुवारीपासून मुंबईत सुरु होत असून ते २५ मार्च पर्यंत चालणार आहे.  ९ मार्च रोजी राज्याचा अर्थसंकल्प विधीमंडळात मांडला जाईल. विधानसभा कामकाज सल्लागार समितीची बैठक आज मुंबईत विधानभवन इथं झाली त्यावेळी हा निर्णय घेण्यात आला. बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.

विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांच्यासह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विधानसभेतले विरोधी पक्षनेते अजित पवार, महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, संसदीय कार्य मंत्री  चंद्रकांत पाटील,  ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांच्यासह छगन भुजबळ, अशोक चव्हाण, जयंत पाटील, आशिष शेलार, छगन भुजबळ, अमीन पटेल आदी मान्यवर कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीला उपस्थित होते. 

आमदारांना आपापले प्रश्न मांडण्याची संधी मिळावी याकरता हे अधिवेशन किमान पाच आठवडे घेण्याची मागणी विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी केली. विधीमंडळ सदस्यांनी सभागृहात विविध आयुधांद्वारे उपस्थित केलेल्या प्रश्नांची योग्य, मुद्देसूद लेखी उत्तरं देण्यात यावी अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.