दूरस्थ पद्धतीने मतदान करण्याची सुविधा देण्याचा केंद्रीय निवडणूक आयोगाचा प्रस्ताव

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : निवडणुकीच्या वेळी मतदारांना आपल्या मतदारसंघात प्रत्यक्ष मतदान केंद्रावर जाऊन मतदान करता येणार नसेल तर ते देशात जिथे असतील तिथून त्यांना मतदान करता यावं अशी सुविधा पुरवण्याचा प्रस्ताव निवडणूक आयोगाने ठेवला आहे. याकरता तयार करण्यात येणाऱ्या मतदान यंत्रात एकावेळी एका ठिकाणाहून 72 वेगवेगळ्या मतदार संघातलं मतदान करण्याची सोय उपलब्ध असेल. सध्याच्या यंत्रामधली सुरक्षा यंत्रणा कायम ठेवून हा बदल करण्यात येणार आहे. वारंवार फिरतीवर जाणाऱ्या किंवा स्थलांतर करणाऱ्या मतदारांना यामुळे दूरस्थ पद्धतीने मतदानाचा हक्क बजावता येईल.

या यंत्राचं प्रात्यक्षिक देण्यासाठी आयोगानं सर्व राष्ट्रीय आणि राज्य पातळीवरच्या मान्यताप्राप्त राजकीय पक्षांची बैठक येत्या 16 जानेवारीला बोलावली आहे. प्रात्यक्षिकानंतर त्यावरचे अभिप्राय 31 जानेवारीपर्यंत आयोगानं मागवले असल्याचं केंद्रीय निवडणूक आयोगाच्या प्रसिद्धी पत्रकात म्हटलं आहे.