अणु संयोगातून ऊर्जानिर्मिती करण्याच्या प्रयोगाला अमेरीकेतल्या संशोधकांना यश

 


नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : अणु संयोगातून ऊर्जानिर्मिती करण्याच्या प्रयोगाला अमेरीकेतल्या संशोधकांना यश मिळालं आहे. यामुळे सुरक्षित आणि कार्बनरहित ऊर्जानिर्मितीच्या पर्याय उपलब्ध होण्याची शक्यता वाढली आहे. कॅलिफोर्नियामधल्या लॉरेन्स लिव्हरमोर राष्ट्रीय प्रयोगशाळेत अणुकेंद्राच्या संयोगाच्या प्रयोगाला मोठे यश आल्याचं अमेरिकेच्या ऊर्जा सचिव जेनिफर ग्रॅनहोम यांनी काल पत्रकार परिषदेत जाहीर केलं. यावेळी प्रयोगाचे संशोधक देखील उपस्थित होते. हा प्रयोग करण्यासाठी वापरल्या गेलेल्या उर्जेपेक्षा जास्त ऊर्जा निर्माण झाल्यानं या प्रयोगाचं विशेष महत्व आहे असं यावेळी संशोधकांनी सांगितलं. या प्रयोगाच्या यशामुळे येत्या काळात संरक्षण क्षेत्र आणि स्वच्छ ऊर्जानिर्मितीमध्ये मोठी क्रांती होऊ शकेल असं अमेरिकेच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं. दरम्यान वीज उद्योगानं या उद्योगाचं सावधपणे स्वागत केलं आहे. ऊर्जेच्या संक्रमणासाठी सौर आणि पवन ऊर्जा, बॅटरी स्टोरेज आणि अणुविखंडन यांसारखे इतर पर्याय तयार करण्यासाठीचे प्रयत्न कमी करू नयेत यावर भर त्यांनी दिला.