निवडणूक साक्षरता मंडळांचा राष्ट्रीय स्तरावरील पथदर्शी प्रकल्प बनवू - मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे

 

पुणे : लोकशाही प्रक्रियेत विद्यार्थ्यांचा, तरुणांचा सहभाग वाढवण्याच्या प्रयत्नांचा एक भाग म्हणून मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने शाळा, महाविद्यालयीन पातळीवर निवडणूक साक्षरता मंडळ स्थापन करण्याचा पथदर्शी प्रकल्प पुण्यामध्ये हाती घेतला आहे. पुढील एक दोन वर्षात चांगल्या पद्धतीचे बदल घडवण्यासाठी सर्वांच्या योगदानातून हा राष्ट्रीय स्तरावरील एक पथदर्शी प्रकल्प बनवू, असा विश्वास राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी व्यक्त केला.

जिल्ह्यातील शाळा व महाविद्यालयांमध्ये स्थापन करण्यात आलेल्या निवडणूक साक्षरता मंडळाच्या जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये आयोजित कार्यशाळेच्या उद्घाटनप्रसंगी श्री. देशपांडे बोलत होते. याप्रंसगी जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, सिम्बॉयसिस आंतरराष्ट्रीय विद्यापीठाच्या प्र कुलगुरू डॉ. विद्या येरवडेकर, एमआयटी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सच्या कार्यकारी संचालक डॉ. सुचित्रा कराड, डेक्कन कॉलेजचे कुलगुरू डॉ. प्रमोद पांडे, वर्शिप अर्थ फांऊडेशनचे संस्थापक पराग मते, राष्ट्रीय सेवा योजनेचे विभागीय व्यवस्थापक डी. कार्तीकेयन उपस्थित होते.

लोकशाही व्यवस्थेच्या बळकटीकरणासाठी तरुणांचा मतदार प्रक्रियेतील सहभाग वाढविण्याची आवश्यकता असल्याचे नमूद करून श्री. देशपांडे म्हणाले, राज्याच्या लोकसंख्येत १८ ते १९ वर्षे वयोगटाचा वाटा ३. ५ टक्के इतका असताना मतदार यादीत यापैकी केवळ ०. ३४ टक्क्यांची नोंदणी आहे. २० ते २९ वयोगटातील तरुणांची लोकसंख्या १८ टक्के असताना मतदार यादीत १२ टक्के तरुण मतदारांची नोंदणी झालेली आहे. त्यामुळे १८ ते १९ वयोगटातील सुमारे ९0 टक्के आणि २० ते २९ वयोगटातील ३० ते ३५ टक्के मुले-मुली मतदार यादीत नाहीत. हे चित्र बदलण्याची गरज आहे.

कोणत्याही नव्या चळवळीमध्ये युवा पिढीची महत्त्वाची भूमिका राहिली आहे. त्याप्रमाणेच लोकशाही बळकटीकरणासाठी निवडणूक प्रक्रियेत विद्यार्थ्यांचा, तरुणांचा सहभाग वाढवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. त्याचाच एक भाग म्हणून विद्यापीठे, शाळा महाविद्यालये आणि विद्यार्थी यांना केंद्रीभूत माणून काम करण्यासाठी महाराष्ट्र राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने हा प्रकल्प हाती घेतला आहे.

विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेला जेवढे महत्व दिले जाते तितकेच त्यांच्या सामाजिक बांधिलकीलाही आहे. आंतरराष्ट्रीय संस्था, परदेशी विद्यापीठांमध्ये प्रवेश किंवा शिष्यवृत्तीप्रसंगी या बाबींना विशेष महत्त्व दिले जाते. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये याची जाणीव जागृती करण्यासाठी शाळा महाविद्यालयातील निवडणूक साक्षरता मंडळ प्रकल्प उपयुक्त ठरणार आहे. शैक्षणिक संस्थांनी आपल्या संस्थेत विद्याशाखानिहाय निवडणूक साक्षरता मंडळे स्थापन करावीत, असे आवाहनही श्री. देशपांडे यांनी केले.

हा प्रकल्प यशस्वी होण्यासाठी प्रेरक म्हणून इन्सेंटिव्ह किंवा सवलती देण्याचे ठरवले आहे. यामध्ये विद्यार्थ्यांची कॉलेज ॲम्बॅसॅडर अर्थात सदीच्छा दूत म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. या विद्यार्थ्यांनी प्रकल्पांतर्गत केलेल्या कामाची नोंद मोबाईल ॲपच्या माध्यमातून होणार असून विद्यार्थ्यांना आंतरवासिता प्रमाणपत्र दिले जाणार आहे.

मतदार यादीमध्ये विद्यार्थ्यांची नोंद व्हावी यासाठी शाळा-महाविद्यालयांनी पुढाकार घ्यावा. विद्यार्थी आणि शैक्षणिक संस्थांनी या कामामध्ये पुढाकार घेतल्याशिवाय अनुकूल बदल होणार नाहीत. विद्यार्थीकेंद्रीत जनमोहिम या प्रकल्पाच्या माध्यमातून यशस्वी करू जेणेकरुन त्याची दखल राष्ट्रीय पातळीवर भारत निवडणूक आयोग घेईल, असेही मुख्य निवडणूक अधिकारी म्हणाले.

जिल्हाधिकारी डॉ. देशमुख म्हणाले, काळानुसार निवडणूकांचे स्वरुप बदलत गेले असून सर्व घटकांचा सहभाग, समावेशकता तसेच वंचित घटकांचा निवडणुकीमध्ये सहभाग आदींकडे विशेष लक्ष दिले जात आहे. निवडणूक साक्षरता मंडळ प्रकल्पासाठी पुणे जिल्ह्यातील १५ शाळा व ४३ महाविद्यालयांची निवड केली आहे. मतदार नोंदणी आणि मतदानाची टक्केवारी एवढाच मर्यादित उद्देश नसून विद्यार्थ्यांचा व्यक्तिमत्व विकास यावरही या प्रकल्पात भर दिला जाणार आहे.

मतदार याद्यांचा सक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रमांतर्गत मतदार यादी जास्तीत जास्त पारदर्शक, सक्षम, अचूक, समावेश असलेली बनवणे या संकल्पनेनुसार काम केले जात आहे. गेल्या दोन वर्षात मतदार यादीमध्ये छायाचित्र नसलेल्या ४ लाख ६ हजार मतदारांचे छायाचित्रे जमा केली, मतदार यादीतील १ लाखापेक्षा जास्त समान नोंदींची तपासणी करुन कार्यवाही केली. २० लाखापेक्षा जास्त दावे व हरकतींवर निर्णय घेतले. त्यामध्ये ७ लाख ६० हजार नवीन मतदारांची नोंदणी आणि ७ लाख १ हजार नावांची वगळणी केली.

जिल्ह्यात १८ ते २९ वयोगटातील तरुणांची लोकसंख्या २३ लाख असताना त्यापैकी केवळ ११ ते १२ लाख जणांनी मतदार नोंदणी केली आहे. हे लक्षात घेऊन मतदार नोंदणी वाढवण्यासाठी प्रशासनाने महाविद्यालयांच्या सहकार्यातून ४४२ महाविद्यालयांमध्ये विशेष शिबीरे आयोजित केली. त्यामध्ये ४३ हजार पेक्षा जास्त मतदार नोंदणीचे अर्ज प्राप्त आहेत. तृतीयपंथी १५० पेक्षा जास्त तृतीयपंथी उमेदवारांची नोंदणी केली आहे. देह व्यवसाय करणाऱ्या महिलांच्या नोंदणीसाठी प्रयत्न सुरू आहेत. ११९ उद्योगांच्या ठिकाणी मतदार नोंदणीसाठी पोहोचलो आहोत, असेही यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.

यावेळी डॉ. येरवडेकर, डॉ. कराड, डॉ. पांडे तसेच श्री. मते यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाला शाळा आणि महाविद्यालयांचे प्राचार्य, निवडणूक साक्षरता मंडळासाठी नेमण्यात आलेले समन्वयक अधिकारी व सदिच्छा दूत उपस्थित होते.

मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाच्या स्वीप समन्वयक पल्लवी जाधव यांनी निवडणूक साक्षरता मंडळाबाबत सादरीकरण केले. वर्शिप अर्थ फाऊंडेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी तेजस गुजराथी यांनी प्रकल्पाबाबत सादरीकरण केले. हा प्रकल्प राबवण्यासाठी मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालय आणि वर्शिप अर्थ फाऊंडेशन समवेत सामंजस्य करार झाल्याचे यावेळी सांगण्यात आले.