भारत चीन सीमाप्रश्नावरुन संसदेच्या दोन्ही सभागृहात गदारोळ

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारत- चीन सीमाप्रश्नावरून विरोधी पक्षाच्या सदस्यांनी आजही संसदेच्या दोन्ही सभागृहात चर्चेची मागणी केल्यामुळे गदारोळ झाला. या प्रश्नावर  सरकारनं दोन्ही सभागृहामधे या आधीच निवेदन केलं असल्याचं सांगत विरोधकांची चर्चेची मागणी फेटाळली.

लोकसभेत या प्रश्नावरून झालेल्या गदारोळामुळे कामकाज दुपारी २ वाजेपर्यंत तहकूब झालं होत. पुन्हा कामकाज सुरु झाल्यावरही काँग्रेस, तृणमुल काँग्रेस, द्रमुक आणि इतर पक्षांच्या सदस्यांनी घोषणाबाजी चालूच ठेवली. हा अतिशय संवेदनशील प्रश्न असून, अशा प्रश्नांवर काँग्रेसच्या काळातही सविस्तर चर्चा होत नव्हती असं संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी म्हणाले.

सभागृहाचं काममकाज चालू द्यावं असं आवाहन त्यांनी सदस्यांना केलं. मात्र विरोधी सदस्यांनी घोषणाबाजी सुरुच ठेवली. त्यामुळे कामकाज दुपारी २ वाजेपर्यंत तहकूब करावं लागलं. सदस्यांनी सभागृहात कोविडविषयक नियमांचं काटेकोर पालन करावं असं आवाहन बिरला यांनी सभागृहात केलं. जगातल्या काही देशांमधे कोविडची साथ पुन्हा बळावत असल्याच्या पार्श्वभूमीवर दक्षता आणि सतर्कता बाळगण्याविषयी जनजागृती करावी असं ते म्हणाले.