पुणे : केंद्रीय गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालयाने देशातील २६४ शहराबद्दल अभिप्राय नोंदविण्यासाठी 'इज ऑफ लिव्हिंग सर्वेक्षण २०२२' आयोजित करण्यात आले असून नागरिकांनी २३ डिसेंबर २०२२ पर्यंत आपले अभिप्राय नोंदवावे, असे आवाहन पुणे स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कार्पोरेशन लि. चे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. संजय कोलते यांनी केले आहे.
नागरिकांनी या सर्वेक्षणात सहभागी होऊन पुणे शहराला प्रथम क्रमांकाचे मानांकन मिळवून देण्यासाठी https://eol2022.org/CitizenFeedback या लिंकवर किंवा क्यू आर कोडवर स्कॅन करून नागरिकांनी आपले अभिप्राय नोंदवावे. यूएलबी कोड-८०२८१४ आहे.
पुणे शहरातील नागरिकांचा सहभाग नोंदविण्यासाठी पुणे स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कार्पोरेशनच्यावतीने लक्ष्मी रस्ता, गोखले चौक फर्ग्युसन रस्ता, जंगली महाराज रस्ता, कर्वेरोड, जगताप चौक वानवडी, पाषाण सूस रस्ता, लुल्लानगर ते गंगाधाम चौक, मगरपट्टा रस्ता शहरातील या प्रमुख रस्त्यांवर रविवार ११ डिसेंबर २०२२ रोजी "इज ऑफ लिव्हिंग सर्वेक्षणाचे आयोजन करण्यात आले होते. या सर्वेक्षणात विद्यार्थी ते जेष्ठ नागरिकांनी आपला ऊस्फूर्तपणे अभिप्राय नोंदविला आहे.
औध, बाणेर व बालेवाडी परिसरातील विविध शैक्षणिक संस्था, रहिवासी सोसायटी, उद्याने व पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या बालेवाडी येथील बस आगाराच्या संरक्षण भिंतीवर 'इज ऑफ लिव्हिंग सर्वेक्षण २०२२' ची आकर्षक चित्रे रेखाटण्यात आलेली आहेत.
पादचारी दिनाचे आयोजन
पुणे महानगरपालिकेतर्फे आयोजित दुसऱ्या पादचारीदिनानिमित्त पादचाऱ्यांची सुरक्षितता आणि त्यांच्यासाठी आवश्यक सुविधांकडे लक्ष वेधण्यासाठी लक्ष्मी रस्त्यावर आयोजित उपक्रमाचे पुणे महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रशासक विक्रमकुमार यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. या वेळी महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त डॉ. कुणाल खेमनार, विकास ढाकणे, पुणे स्मार्ट सिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. संजय कोलते आदी उपस्थित होते.