आकाशवाणी आणि दूरदर्शननं नेहमीच सत्याच्या बाजूनं उभं राहत लोकांचा विश्वास संपादन केला - अनुराग ठाकूर यांचं प्रतिपादन

 


नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : आकाशवाणी आणि दूरदर्शननं नेहमीच सत्याच्या बाजूनं उभं राहत लोकांचा विश्वास संपादन केला आहे, असं माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांनी म्हटलं आहे. ते आज नवी दिल्ली इथं अबू, अर्थात आशिया-प्रशांत प्रसारक संघटनेच्या ५९ व्या सर्वसाधारण सभेच्या उद्घाटन सत्रात बोलत होते. लोकांच्या निर्णयप्रक्रियेवर प्रसारमाध्यमं मोठा प्रभाव टाकत असतात. म्हणूनच माध्यमांनी जलद बातम्या देण्यापेक्षा बातमीच्या अचूकतेला प्राधान्य देणं आवश्यक असतं, असं ते म्हणाले. कोविड महामारीच्या काळात मुख्य प्रवाहातल्या प्रसारमाध्यमांनी प्रसिद्ध केलेल्या बातम्यांची शहानिशा करण्यासाठी सरकारनं एक फॅक्ट चेक युनिट अर्थात सत्यशोधन विभाग सुरु केला होता. लोकांपर्यंत बातम्या जाण्याआधी त्यातली तथ्य तपासण्याकरता आकाशवाणी आणि दूरदर्शननं त्यांची यंत्रणा योग्यप्रकारे राबवली, असं ठाकूर यांनी सांगितलं. अशा प्रकारच्या आव्हानांवर मात करण्यासाठी तसंच जागतिक प्रसारणातला रस वाढवण्यासाठी भारतीय प्रसारमाध्यमांना बाहेरच्या जगाशी संवाद साधण्याची आणि त्यापासून शिकण्याची संधी अबूसारख्या कार्यक्रमांमुळे मिळते, असं ते म्हणाले. “लोकांची सेवा- संकटकाळात प्रसारमाध्यमांची भूमिका” ही अबूच्या यंदाच्या सर्वसाधारण सभेची संकल्पना कोविड सारख्या संकटाला सामोरं गेल्यानंतर अत्यंत सुसंगत अशी आहे, असं प्रसारभारतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी गौरव द्विवेदी यांनी यावेळी सांगितलं.