९६ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी नरेंद्र चपळगावकर यांची निवड

 


मुंबई (वृत्तसंस्था) : वर्धा इथं होणाऱ्या ९६ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ साहित्यिक न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकर यांची निवड करण्यात आली आहे. अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या बैठकीत आज त्यांच्या नावावर एकमत झाल्याचं अखिल भारतीय मराठी साहित्‍य महामंडळाच्‍या अध्‍यक्ष उषा तांबे यांनी वर्धा इथं पत्रकार परिषदेत सांगितलं. मुंबई उच्च न्यायालयाचे सेवानिवृत्त न्यायाधीश आणि प्रसिद्ध लेखक नरेंद्र चपळगावकर हे अभ्यासपूर्ण आणि तर्कशुद्ध मांडणीसाठी प्रसिद्ध आहेत. त्यांनी चरित्र-आत्मचरित्राबरोबरच विविध वैचारिक ग्रंथांचं लेखन केलेलं आहे. तसंच विविध संस्थांचे पुरस्कारही त्यांना मिळालेले असून अनेक संस्थांवर त्यांनी काम केलं आहे. त्यांची अनेक ललित, भाषाविषयक, समीक्षा, न्यायविषयक कथा, व्यक्तिचित्रणं प्रकाशित झाली आहेत. विदर्भ साहित्य संघाच्या शताब्दी वर्षाचं औचित्य साधत विदर्भात वर्धा इथं ३ ते ५ फेब्रुवारी या कालावधीत हे  साहित्य संमेलन होत आहे. संमेलनाची सुरुवात प्रथेनुसार ग्रंथदिंडीने ३ तारखेला सकाळी साडे ८ वाजता होईल. मुलाखत, परिसंवाद, प्रकाशन कट्टा, वाचक कट्टा, कवी संमेलने, कवी कट्टा, असे अनेक कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहेत.