संविधान दिनाच्या निमित्ताने तृतीयपंथी मतदार नोंदणी कार्यक्रम

 

पुणे : भारत निवडणूक आयोगामार्फत १ जानेवारी २०२२ या अर्हता दिनांकावर आधारित छायाचित्र मतदार यादीचा विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम घोषित करण्यात आला असून संविधान दिनाच्या औचित्याने तृतीयपंथी समुदायातील मतदार नोंदणीसाठी जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख यांच्या उपस्थितीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन येथे विशेष शिबिराचे आयोजन करण्यात आले.

कार्यक्रमास समाज कल्याण सहाय्यक आयुक्त संगीता डावखर, २०८ वडगावशेरी विधानसभा मतदार संघाचे मतदार नोंदणी अधिकारी संदीप कदम व निवडणूक विभागाचे अन्य अधिकारी उपस्थित होते.

जिल्ह्यात तृतीय पंथीय, देह व्यवसायातील स्त्रिया, दिव्यांग, भटक्या व विमुक्त जमाती अशा वंचित घटकांना मतदार नोंदणीमध्ये समाविष्ट करण्यासाठी विशेष शिबीरांचे आयोजन करण्यात येत आहेत. समाजातील सर्व घटकातील मतदारांना निवडणूक प्रक्रियेत समाविष्ट करून घेण्यासाठी विशेष प्रयत्न करण्यात येत आहेत. त्याअनुषंगाने सामाजिक न्याय विभागातर्फे आयोजित 'समता पर्व' अंतर्गत तृतीयपंथीय समुदायातील मतदार नोंदणीच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. विशेष शिबिराअंतर्गत मतदार नोंदणी करण्यात आली.

जिल्ह्यात तृतीयपंथी समुदायातील व्यक्तींना मतदार नोंदणी करण्यासाठी प्रोत्साहित करण्यावर भर देण्यात येत आहे. नमुना क्र. ६ चा अर्ज nvsp.in, voterportal.eci.gov.in आणि Voter Helpline App द्वारे ऑनलाईन पद्धतीने भरुन आपले नाव मतदार यादीत नोंदविता येईल किंवा आपल्या जवळच्या मतदार नोंदणी अधिकारी कार्यालयात मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांच्याकडे ऑफलाईन पद्धतीने अर्ज सादर करता येईल, अधिकाधिक तृतीयपंथी व्यक्तींनी मतदार नोंदणी करुन लोकशाही प्रक्रियेत बहुमोल सहभाग नोंदवावा, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ.देशमुख यांनी केले आहे.