शिक्षकांच्या वाढीव अनुदानाचा प्रश्न सोडवण्याचं शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांचं आश्वासन

 


मुंबई (वृत्तसंस्था) : घोषित शाळांमधल्या शिक्षकांच्या वाढीव टप्पा अनुदानाचा प्रश्न सोडवण्याचं आश्वासन शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी दिलं आहे. वेतन अनुदानाचं सूत्र पूर्वीप्रमाणे लागू करावं, या मागणीसाठी शिक्षक समन्वय समितीच्या माध्यमातून आंदोलन करत असलेल्या संबंधित शिक्षक प्रतिनिधींसोबत केसरकर यांनी आज मंत्रालयात बैठक घेतली. हा प्रलंबित प्रश्न सोडवण्याबाबत शासन सकारात्मक आहे. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांना याबाबत सविस्तर माहिती दिली जाईल आणि अनुदानाच्या विविध टप्प्यांवरच्या पात्र शिक्षकांची संख्या, त्यासाठी येणारा खर्च याबाबत सविस्तर माहिती घेऊन, मुख्यमंत्री येत्या १५ तारखेला याबाबतचा निर्णय जाहीर करतील, असं केसरकर यांनी सांगितलं. याप्रश्नी संबंधित शिक्षकांनी सुरू केलेलं आंदोलन थांबवावं, असं आवाहनही त्यांनी केलं.