राज्यपालांच्या विरोधात तमाम महाराष्ट्रप्रेमींनी एकत्र येण्याचं उद्धव ठाकरे यांचं आवाहन

 

मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी वारंवार महाराष्ट्राचा, महाराष्ट्राच्या दैवतांचा अपमान करत आहेत, अशी टीका माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली असून, पक्षीय राजकारण बाजूला ठेवून तमाम महाराष्ट्रप्रेमींनी याविरोधात एकत्र यावं, असं आवाहनही त्यांनी केलं आहे. ते आज मातोश्री निवासस्थानी आयोजित वार्ताहर परिषदेत बोलत होते.

केंद्र सरकारनं राज्यपालांना त्वरित माघारी बोलावून घेतलं नाही तर महाराष्ट्र प्रेमी आंदोलन करतील, असा इशारा त्यांनी यावेळी दिला. केंद्रात सत्ता असणाऱ्या पक्षाच्या विचारसरणीची व्यक्ती राज्यपाल म्हणून नेमली जाते, याबद्दल रोष व्यक्त करत, राज्यपाल नेमणुकीचे निकष ठरवण्याची गरज निर्माण झाल्याचं ते म्हणाले.  

राज्य मंत्रिमंडळाची बैठक काल झाली नाही कारण मंत्री गुजरातमध्ये प्रचाराला गेले होते. त्यांनी राज्य वाऱ्यावर सोडलं आहे, या सरकारमुळेही महाराष्ट्राची अवहेलना होत आहे, अशी टीका ठाकरे यांनी केली. कर्नाटकचे मुख्यमंत्री महाराष्ट्राच्या प्रदेशावर हक्क सांगताहेत , यामागे कुणाचा हात आहे, हे तपासलं पाहिजे, असंही ते म्हणाले.