राज्य शासन आणि बांधकाम व्यावसायिकांनी परस्पर सहकार्यानं केल्यास गृहनिर्माण क्षेत्राला उर्जितावस्था मिळेल - मुख्यमंत्री

 

मुंबई (वृत्तसंस्था) : राज्य शासन आणि बांधकाम व्यावसायिकांनी परस्पर सहकार्यानं काम केलं तर गृहनिर्माण क्षेत्राला उर्जितावस्था मिळेल, असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल व्यक्त केला.

वांद्रे कुर्ला संकुलातल्या एमएमआरडीए मैदानात आयोजित मालमत्ताविषयक प्रदर्शनाचं उद्घाटन शिंदे यांच्या हस्ते झालं, त्यावेळी ते बोलत होते. हे प्रदर्शन १६ ऑक्टोबर पर्यंत सुरू राहणार आहे. बांधकाम व्यवसायासाठी शासनाकडून आवश्यक ते सर्व सहकार्य केलं जाईल; अशी ग्वाही शिंदे यांनी यावेळी दिली.

सरकारनं विविध सवलती दिल्यामुळे बांधकाम व्यावसायिकांनी सर्वसामान्यांसाठी परवडणाऱ्या दरात घरं उपलब्ध करून द्यावीत, असं आवाहनही त्यांनी केलं. एमएमआरडीए मुंबईत पायाभूत सुविधा वाढवण्यावर भर देत आहे; पुढच्या वर्षी पूर्ण होणाऱ्या ट्रान्स हार्बर लिंकमुळे मुंबई उर्वरित महाराष्ट्राशी आणखी जवळ येईल आणि त्याचा लाभ बांधकाम क्षेत्राला देखील होईल, असं एमएमआरडीएचे आयुक्त श्रीनिवास यांनी यावेळी सांगितलं.