‘सबका साथ, सबका विकास’ ही संकल्पना म्हणजे विकासाचं आदर्श मॉडेल असल्याची प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची भूमिका

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : ‘सबका साथ, सबका विकास’ ही संकल्पना म्हणजे विकासाचं आदर्श मॉडेल असून देशातल्या शहरांच्या विकासाचा आराखडा तयार करण्यासाठी या दोन दिवसीय संमेलनाची मुख्य भूमिका असेल, असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी म्हणाले. गुजरातची राजधानी गांधीनगर इथं आयोजित राष्ट्रीय महापौर संमेलनाचं उद्घाटन आज प्रधानमंत्र्यांच्या हस्ते दूरदृष्य प्रणालीच्या माध्यमातून झालं,त्यावेळी ते बोलत होते.

देशभरातील भाजपा शासित महापालिकांचे १२१ महापौर आणि उपमहापौर या दोन दिवसांच्या संमेलनात सहभागी झाले असून भाजपाच्या सुशासन विभागातर्फे या संमेलनाचं आयोजन करण्यात आलं आहे. भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष जगत प्रकाश नड्डा, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केन्द्रीय मंत्री हरदीप सिंह पुरी उद्घाटन सोहळ्यात उपस्थित होते. दोन दिवसांच्या या संमेलनात शहरीकरण आणि शहरी विकास या मुद्द्यांवर चर्चा होणार आहे.