पिंपरी चिंचवड महापालिका शाळांमधील विद्यार्थ्यांचे नेत्रविकार होणार दूर ; आमदार लक्ष्मण जगताप यांच्या सूचनेनंतर सर्व शाळांमध्ये नेत्र तपासणीला सुरूवात

 

पिंपरी : कोरोना काळात ऑनलाइन शिक्षण घेण्याची वेळ आल्याने शालेय विद्यार्थ्यांमध्ये डोळ्यांशी संबंधित अनेक लक्षणे व आजार समोर आले आहेत. त्यामुळे आमदार लक्ष्मण जगताप यांनी पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या प्राथमिक व माध्यमिक शाळेतील सर्व विद्यार्थ्यांच्या डोळ्यांच्या तापसणीसाठी शिबीर आयोजित करण्याबाबत आयुक्तांना पत्र पाठवून सूचना केली होती. त्याची दखल घेत महापालिकेच्या वैद्यकीय विभागाने प्राथमिक व माध्यमिक शाळांमधील विद्यार्थ्यांसाठी त्या त्या शाळांमध्ये नेत्र तपासणी शिबीर घेण्यास सुरूवात केली आहे. या तपासणीतून नेत्रविकाराची लक्षणे दिसणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांवर योग्य उपचार करावेत, अशी सूचनाही आमदार जगताप यांनी महापालिका आयुक्त शेखर सिंह यांना केली आहे.

कोरोनाचे संकट आल्यानंतर देशात संपूर्ण लॉकडाऊन लागू करण्यात आले होते. त्या काळात शालेय विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी ऑनलाइन शाळा सुरू करण्यात आल्या होत्या. विद्यार्थी मोबाईल, लॅपटॉप आणि संगणकाद्वारे ऑनलाइन शिक्षण घेत होते. सलग दोन वर्षे विद्यार्थ्यांना ऑनलाइन शिक्षण घ्यावे लागले. त्यासाठी सतत मोबाईलचा वापर करावा लागल्याने अनेक विद्यार्थ्यांना डोळे दुखणे, डोळ्यांमध्ये लालसरपणा आणि सूज येणे यांसारखे आजार तसेच इतर लक्षणे जाणवू लागले आहेत. अनेकांनी त्याकडे दुर्लक्ष करणे पसंत केल्यामुळे हे आजार भविष्यात त्या विद्यार्थ्यांच्या डोळ्यांसाठी धोकादायक ठरू शकतात.

आर्थिक परिस्थिती हलाखीची असणाऱ्या कुटुंबातील विद्यार्थ्यांना डोळ्यांच्या आजारावर उपचार घेणे शक्य होत नाही. डोळ्यासारख्या संवेदनशील भागाला झालेल्या आजाराला गांभीर्याने घेण्याची गरज लक्षात घेऊन आमदार लक्ष्मण जगताप यांनी महापालिका आयुक्तांना २७ जुलै २०२२ रोजी एक पत्र पाठवले होते. त्या पत्रात आमदार जगताप यांनी महापालिकेच्या प्राथमिक आणि माध्यमिक शाळांमधील विद्यार्थ्यांसाठी नेत्र तपासणी शिबीर घेण्याची सूचना आयुक्तांना केली होती.

त्याची दखल घेत महापालिका प्रशासनाने सर्वच महापालिका शाळांमध्ये नेत्र तपासणी शिबीर घेण्याचे वेळापत्रक तयार करून त्याची अंमलबजावणी सुरू केली आहे. या नेत्र तपासणी शिबीराची जबाबदारी त्या त्या शाळांचे मुख्याध्यापक आणि पर्यवेक्षकांवर सोपवण्यात आली आहे. त्यांनी केलेल्या नियोजनानुसार महापालिकेच्या वैद्यकीय विभागामार्फत सर्व शाळांमध्ये विद्यार्थ्यांसाठी नेत्र तपासणी शिबीर आयोजित केले जात आहेत. त्याबद्दल आमदार लक्ष्मण जगताप यांनी समाधान व्यक्त केले आहे. या शिबीरात डोळ्याशी संबंधित आजाराची लक्षणे दिसणाऱ्या विद्यार्थ्यांवर महापालिकेमार्फत योग्य उपचार करण्यात यावेत, अशी सूचनाही त्यांनी आयुक्त शेखर सिंह यांना केली आहे.