कर्ज पुरवणाऱ्या मोबाईल ऍप्सच्या कंपन्यांनी नियमांचं पालन करावं अशी रिझर्व बँकेची अपेक्षा

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : रिझर्व्ह बँकेचा उद्देश हा उद्योजकांना शिक्षा करण्याचा किंवा नवीन कल्पनांची कोंडी करण्याचा नसून त्यांना नियमांचं पालन करायला लावण्याचा आहे असं प्रतिपादन रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी केलं. काल मुंबईत तिसऱ्या जागतिक फिनटेक परिषदेत ते बोलत होते. नवीन कल्पनांचं स्वागतच आहे, मात्र त्यांनीही जबाबदारीनं आणि ग्राहकांच्या हितासाठी काम करावं असं ते म्हणाले.

गेल्या काही दिवसांमध्ये काही ऍप्सवरून कर्ज घेतलेल्या लोकांना आत्महत्या करण्यास भाग पाडलं गेल्याच्या घटना घडल्या होत्या. गेल्या आठवड्यात बिहारमध्ये ट्रॅक्टर खरेदी करण्यासाठी घेतलेल्या कर्जाची वसूली करण्याकरिता गेलेल्या लोकांनी एका गर्भवती महिलेच्या अंगावरून ट्रॅक्टर चालवल्याची घटनाही ताजी आहे. महाराष्ट्रातही बनावट मोबाईल ऍप्सच्या माध्यमातून कर्ज दिल्यानंतर लोकांना धमकावणं आणि बळजबरीनं पैसे वसूल करण्याच्या घटना घडल्या आहेत.