वायसीएमबाबत रुग्णांच्या वाढलेल्या तक्रारी पिंपरी-चिंचवड महापालिकेला शोभणाऱ्या नाहीत; आमदार लक्ष्मण जगताप यांनी महापालिका आयुक्तांना केली “ही” सूचना

 

पिंपरी : पिंपरी-चिंचवड तसेच आसपासच्या ग्रामीण भागातील रुग्णांसाठी महत्त्वाचे असलेल्या महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयातील सोई-सुविधा आणि वैद्यकीय सेवेबाबत रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांच्या तक्रारी वाढत आहेत. ही बाब श्रीमंत म्हणून गणल्या जाणाऱ्या पिंपरी-चिंचवड महापालिकेसाठी शोभनीय नाही. त्यामुळे या रुग्णालयात रुग्णांसाठी चांगल्या मुलभूत सुविधा, दर्जेदार वैद्यकीय उपचार, सर्व आजारांवरील औषधे, आवश्यक डॉक्टर्स व इतर वैद्यकीय कर्मचारी उपलब्ध करून देण्याबाबत तातडीने कार्यवाही करण्यात यावी. यासंदर्भात अधिकारी आणि लोकप्रतिनिधींची बैठक घेण्यात यावी, अशी सूचना आमदार लक्ष्मण जगताप यांनी महापालिका आयुक्त राजेश पाटील यांना केली आहे.

यासंदर्भात आमदार लक्ष्मण जगताप यांनी महापालिका आयुक्त राजेश पाटील यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, “पिंपरी-चिंचवड महापालिकेचे यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालय शहरातील गोरगरीब रुग्णांसाठी महत्त्वाचे रुग्णालय आहे. त्याचप्रमाणे शहराच्या आसपासच्या ग्रामीण भागातील गोरगरीब रुग्णांना सुद्धा याच रुग्णालयाचा मोठा आधार मिळत आहे. परंतु, गेल्या काही महिन्यांपासून यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयाबाबत रुग्ण, त्यांचे नातेवाईक तसेच विविध सामाजिक संघटनांच्या तक्रारी वाढत आहेत. त्यासाठी या रुग्णालयातील वैद्यकीय सेवा व उपलब्ध सुविधा तसेच अपुरे मनुष्यबळ कारणीभूत ठरत आहे.  

रुग्णालयात रुग्णांवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांना लागणारे वैद्यकीय साहित्य तसेच आधुनिक वैद्यकयी साधने उपलब्ध नाहीत. रुग्णांवर रात्रीच्या वेळी शस्त्रक्रिया करण्यासाठी सुविधा उपलब्ध नाहीत. उपचारासाठी येणाऱ्या रुग्णाला वेगवेगळ्या ठिकाणी रांगेत उभे राहावे लागत असल्यामुळे त्यावर प्रत्यक्ष उपचारासाठी दोन ते तीन तासाचा अवधी लागत आहे. नवीन केस पेपर, औषधे घेणे, वैद्यकीय बिले भरण्यासाठी रुग्ण संख्येच्या तुलनेत काऊंटर अपुरे पडत आहेत. रुग्णांना हेल्थ कार्ड वाटप बंद करण्यात आले आहे. शस्त्रक्रिया विभागातील अपुऱ्या सुविधा व कर्मचाऱ्यामुळे गोरगरीब रुग्णांना शस्त्रक्रियेसाठी दोन ते तीन महिने प्रतीक्षा करावी लागत आहे. अतिदक्षता विभागात दाखल होण्यासाठी रुग्णांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. परिणामी यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयात येणारे रुग्ण आणि नातेवाईक त्रस्त होत आहेत. या रुग्णालयाबाबत त्यांच्या तक्रारींमध्ये वाढ झाली आहे.

ही बाब पिंपरी-चिंचवड महापालिकेसाठी शोभनीय नाही. महापालिकेमार्फत यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयावर दरवर्षी कोट्यवधी रुपये खर्च करूनही तेथे गोरगरीब रुग्णांना अपुऱ्या सुविधा आणि नाहक मनःस्ताप सहन करावा लागत असेल, तर महापालिका प्रशासनाने निश्चितच त्याबाबत गांभीर्याने विचार करण्याची गरज निर्माण झाली आहे. त्यामुळे या रुग्णालयात चांगल्या मुलभूत सुविधा, वैद्यकीय सेवा, आवश्यक डॉक्टर्स व कर्मचारी उपलब्ध करून देण्यासाठी प्रशासनाकडून तातडीने कार्यवाही करण्यात यावी. त्याचप्रमाणे यासंदर्भात लोकप्रतिनिधी आणि वैद्यकीय विभागाच्या अधिकाऱ्यांची एक बैठक आयोजित करुन रुग्णालयातील वैद्यकीय सुविधा दर्जेदार करण्याबाबत चर्चा व्हावी, अशी सूचना त्यांनी केली आहे.”