मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावरील वाहतूक कोंडीबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची चांदणी चौक परिसराला भेट

 

मुंबई (वृत्तसंस्था) : मुंबई-बेंगळुरू राष्ट्रीय महामार्गावरील चांदणी चौक परिसरातली वाहतूक कोंडी टाळण्यासाठी तातडीने आवश्यक उपाययोजना करून जनतेला दिलासा द्या, असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल दिले. वाहतूक नियोजनासाठी तातडीने अतिरिक्त वाहतूक मार्शल नेमण्यात यावे. चौकातील पूल पाडल्यानंतर सर्व्हिस रोड तातडीने तयार करावा. गर्दीच्या वेळी शहरात येणाऱ्या जड वाहनांची वाहतूक योग्य रितीने नियंत्रित करावी. वाहतूक नियोजनाच्या दृष्टीने आवश्यक कामे युद्ध पातळीवर करावी अशा सूचना त्यांनी दिल्या. मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या निर्देशानुसार तातडीने उपाययोजना करण्यात येत असल्याचं अधिकाऱ्यांनी यावेळी सांगितलं.

मुख्यमंत्री साताऱ्याकडे जात असताना नागरिकांनी चांदणी चौक परिसरातली वाहतुकीची समस्या त्यांच्या निदर्शनास आणून दिली होती. शिंदे यांनी तातडीने या तक्रारीची दखल घेत अधिकाऱ्यांना या भागाला भेट देऊन आवश्यक कामे तातडीने करण्याचे निर्देश शुक्रवारी दिले होते. दरम्यान मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील खालापूर पथकर नाक्यालाही काल मुख्यमंत्र्यांनी भेट दिली. सण-उत्सव, सुट्ट्यांच्या काळात मुंबई- पुणे द्रुतगती महामार्गावर होणारी वाहतूक कोंडी आणि पथकर नाक्यावर होणारी गर्दी टाळण्यासाठी आवश्यक ते मनुष्यबळ वाढवावे; तसंच सीसीटीव्ही यंत्रणा सक्षम करण्याचे निर्देशही शिंदे यांनी दिले.