देशात कृष्मजन्माष्टमी उत्साहात

 


नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : श्रीकृष्ण जन्मोत्सव अर्थात जन्माष्टमीचा सण आज साऱ्या देशभर साजरा होत आहे. श्रीकृष्णाचं जन्मस्थान म्हणून ओळखल्या जाणाऱ्या उत्तरप्रदेशातील मथुरा आणि वृंदावन इथल्या तसंच देशभरातल्या श्रीकृष्ण मंदिरांमध्ये भाविकांची  दर्शनासाठी गर्दी उसळली आहे. कृष्णाचा जन्म ज्या ठिकाणी झाला असं मानलं जातं त्या मंदिरात जन्माष्टमीनिमित्त आकर्षक सजावट करण्यात आली आहे. राष्ट्रपती द्रोपदी मुर्मू, उपराष्ट्रपती जगदीप धनखड आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनतेला जन्माष्टमीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

दहीकाला अर्थात दहीहंडीचा उत्सव म्हणजे मराठी मनामनांत उधाणलेला उत्साह. या उत्सव, उत्साहातून प्रेरणा घेऊन महाराष्ट्राच्या विकासाला गवसणी घालण्याचा प्रयत्न करूया, त्यातून येणारी समृद्धी, आनंद, समाधानाची लयलूट करूया, अशा शब्दांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातील नागरिकांना शुभेच्छा दिल्या आहेत.

महाराष्ट्रात सर्वत्र काल रात्री कृष्ण जन्म साजरा झाल्यानंतर आज दहिहंडीचा थरार रंगणार आहे. गेली दोन वर्ष कोरोनाच्या साथीमुळं हा उत्सव साजरा करण्यावर बंधनं आली होती, यंदा मात्र दहिहंडी उत्सवावर कोणतीही बंधनं नसल्यानं यावेळी नागरिकांमध्ये विशेष उत्साह आहे. दरम्यान राज्याची सांस्कृतिक ओळख आणि परंपरा असलेल्या दहिहंडीच्या प्रो गोविंदा स्पर्धा घेण्यात येतील अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल विधानसभेत केली. स्पर्धेसाठी बक्षीसाची रक्कम शासनातर्फे देण्यात येईल. त्याचबरोबर गोविंदांना खेळाडू संवर्गातून शासकीय नोकरी देण्यात येईल; असंही ते म्हणाले. स्पेन आणि चीन या देशांमध्ये मानवी मनोरे म्हणून या खेळाचा क्रीडा प्रकारात समावेश असून आपल्याकडे असलेल्या कबड्डी, खो-खो, मल्लखांब सारख्या खेळांप्रमाणे दहीहंडीचाही समावेश होईल, असं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं.

दहीहंडी उत्सवाच्या पार्श्वभूमीवर मानवी मनोरे तयार करताना आवश्यक त्या स्थानिक अधिकृत परवानगी घेतलेल्या तसंच प्रशिक्षित पथकातील गोविंदांना मनोऱ्याच्या थरावरुन पडून मृत्यू झाल्यास त्यांच्या कायदेशीर वारसांना १० लाख रुपयाचं आर्थिक सहाय्य करण्यात येईल. तसंच गंभीर जखमींना साडे सात लाख रुपये किंवा ५ लाख रुपये आर्थिक सहाय्य दिलं जाईल, अशी घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली. 

हा आदेश केवळ या वर्षीसाठी लागू राहील. दहीहंडी उत्सवात सहभागी होणाऱ्या गोविंदांचा विमा उतरवण्याबाबत स्वतंत्रपणे निर्णय घेण्यात येईल. दहीहंडी उत्सव आजच असल्यानं विमा योजनेच्या बाबतीत कार्यवाही करण्यासाठी कमी कालावधी असल्याने आर्थिक सहाय्य देण्याचा निर्णय घेण्यात येत आहे, असंही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं.

आज दहीहंडी असून  कार्यक्रमा दरम्यान कोणत्याही गोविंदास दुखापत झाल्यास शासकीय रुग्णालयांमध्ये त्यांना मोफत उपचार देण्यात यावेत अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल विधानसभेत केली होती. त्यानुसार राज्यातील सर्व शासकीय दवाखाने, वैद्यकीय महाविद्यालये,  महानगरपालिका, नगरपालिका, जिल्हापरिषदेचे दवाखाने यांना नि:शुल्क वैद्यकिय उपचार करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. यासंदर्भात काढण्यात आलेला शासन निर्णय हा स्थायी असून यावर्षी पासून दर वर्षासाठी लागू राहील.

मुंबईत दहीहंडीचा जल्लोष आज सकाळपासूनच सुरू झाला आहे. मुंबईतले रस्ते गोविंदांच्या पथकांनी फुलले आहेत. दहीहंडी फोडताना मुंबईच्या विविध पथकांमधले ५१ गोविंदा जखमी झाले आहेत. जखमी गोविंदांवर वेगवेगळ्या रुग्णालयांमध्ये उपचार सुरू आहेत. या गोविंदांची प्रकृती स्थिर असून आतापर्यंत २७ गोविंदांना रुग्णालयातून घरी सोडलं आहे. मुंबई-ठाण्यातला दहीहंडी उत्सव जल्लोषात सुरू आहे. ठाण्यात टेभीनाका इथल्या दहीहंडी उत्सवात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सहभागी झाले होते. त्यांनी गोविंदाना शुभेच्छा दिल्या. गिरगावमधल्या दहीहंडीत आदित्य ठाकरे सहभागी झाले आहेत.