भाजपासोबत युती करण्याची प्रक्रिया आधीपासूनच सुरू होती- दीपक केसरकर

 

मुंबई (वृत्तसंस्था) : एकनाथ शिंदे बंडखोर आमदारांनी गुवाहाटीला घेऊन गेल्यावर या गटातल्या एकाला उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करायला पाठवलं होतं. त्यावेळी एकनाथ शिंदे यांची साथ सोडा आपण भाजपासोबत युती करू, असा प्रस्ताव उद्धव ठाकरे यांनी दिला होता, असा दावा शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी केला आहे. ते आज मुंबईत वार्ताहर परिषदेत बोलत होते. मात्र आम्ही आणि भाजपानं हा प्रस्ताव नाकारल्याचंही ते म्हणाले. भाजपासोबत युती करण्याची प्रक्रिया आधीपासूनच सुरू होती.

अभिनेता सुशांतसिंग राजपूत आत्महत्येप्रकरणी शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांची बदनामी झाली, त्यामुळे सारेच व्यथित झाले होते. त्यानंतर नारायण राणे यांना भाजपानं केंद्रीय मंत्रीपद दिल्यानं, तसंच भाजपाच्या १२ आमदारांच्या निलंबनामुळे भाजपाबरोबर युतीची चर्चा थांबली. आता तीच प्रक्रिया पूर्णत्त्वाला नेल्याबद्दल आमच्यावर होणारी टीका योग्य नाही, असं केसरकर म्हणाले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत असणारे आमदार आजही शिवसेनेतच असल्याचा पुनरुच्चार त्यांनी केला.