देशभरातून कारगिल हुतात्म्यांना आदरांजली

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : आज २६ जुलै म्हणजेच कारगिल विजय दिवस. या दिनानिमित्त आपल्या प्राणांची आहुती देणाऱ्या हुतात्मा जवानांना आदरांजली वाहण्यात येते. कारगिल विजय दिवस हा आपल्या सैन्याच्या अतुलनीय पराक्रमाचं आणि दृढ निश्चयाचं प्रतीक आहे. देशातील जनता ही जवानांच्या आणि त्यांच्या कुटुंबियांच्या ऋणात राहील, अशा शब्दात  राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी या जवानांना ट्विटर संदेशाद्वारे आदरांजली वाहिली आहे. मातृभूमीच्या रक्षणासाठी साहस आणि शौर्य दाखवणाऱ्या सैनिकांना वंदन असून कारगिल दिवस हा भारतमातेच्या गौरवाचं प्रतीक आहे, अशा शब्दांत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी विजय दिवसानिमित्त आदरांजली वाहिली.

१९९९ साली झालेल्या कारगिल युद्धात भारतीय सैन्यानं मोठं शौर्य गाजवलं आणि देशाचं रक्षण केलं. त्यांच्या ऋणातून देश कधीही उतराई होऊ शकत नाही अशा शब्दात उपराष्ट्र्पती एम व्यंकय्या नायडू यांनीही जवानांच्या हौतात्म्याचं स्मरण केलं. नवी दिल्ली इथल्या राष्ट्रीय युद्ध स्मारकात संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी देखील या हुतात्मा जवानांना श्रद्धांजली अर्पण केली. लष्करप्रमुख जनरल मनोज पांडे, नौदल प्रमुख ऍडमिरल आर हरी कुमार आणि हवाई दल प्रमुख एअर चीफ मार्शल व्हीआर चौधरी हेही राष्ट्रीय युद्ध स्मारकावर उपस्थित होते. त्यांनीही हुतात्म्यांना आदरांजली वाहिली.

कारगिल विजय दिवस भारत मातेच्या गौरवाचा दिवस आहे. मातृभूमीच्या रक्षणासाठी आपले सर्वस्व पणाला लावून विजयश्री प्राप्त करणाऱ्या सर्व शूरवीर जवानांना मानाचा मुजरा व हुतात्म्यांना अभिवादन, अशा शब्दांत राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी ट्विटर संदेशाद्वारे आपली आदरांजली वाहिली. भारत सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयाअंतर्गत कार्यरत केंद्रीय संचार विभाग कोल्हापूरनं कारगिल विजय दिवस साजरा केला. यावेळी राष्ट्रीय छात्रसेनेच्या ५६ महाराष्ट्र बटालियनचे कमांडिंग ऑफीसर कर्नल डी एस सयाना प्रमुख पाहुणे होते. क्षेत्रीय संपर्क ब्युरोचे अधिकारी महेश चोपडे उपस्थित होते.

हिंगोलीत जिल्हाधिकारी कार्यालयात कारगील विजय दिनानिमित्त जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी भारत मातेच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन शहिदांना अभिवादन केलं. कारगिल शहीद दिनानिमित्त आज उस्मानाबाद इथं भारतीय जनता युवा मोर्चा भारतीय जनता पार्टीच्या वतीनं तिरंगा पदयात्रेचे आयोजन करण्यात आलं होतं. कारगिल विजय दिवसानिमित्त केंद्र सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या नांदेड इथल्या केंद्रीय संचार ब्यूरो आणि स्कॉटिश अकॅडमी, कारेगाव परभणी यांच्या संयुक्त विद्यमानं विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं.